चिकनगुनिया सदृश्य आजाराने वाशीकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:01+5:302021-07-22T04:21:01+5:30

वाशी : शहरात डासांचे प्रमाण वाढल्यामुळे चिकनगुनियासदृश्य आजाराचे रुग्ण आढळून येत असून, कोरोनाच्या भीतीमुळे हे रुग्ण शासकीय रुग्णालयात न ...

Vashikar suffers from Chikungunya-like disease | चिकनगुनिया सदृश्य आजाराने वाशीकर त्रस्त

चिकनगुनिया सदृश्य आजाराने वाशीकर त्रस्त

googlenewsNext

वाशी : शहरात डासांचे प्रमाण वाढल्यामुळे चिकनगुनियासदृश्य आजाराचे रुग्ण आढळून येत असून, कोरोनाच्या भीतीमुळे हे रुग्ण शासकीय रुग्णालयात न जाता खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग, तसेच नगरपंचायतीने याकडे गांभीर्याने पाहणी गरज व्यक्त होत आहे.

वाशी शहरातील झोपडपट्टी, जुनी पाण्याची टाकी या भागात सध्या चिकनगुनियासदृश्य आजार झालेले रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी शहरातील शिवाजीनगर भागात असे रुग्ण वाढले होते. शहरातील नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची जबाबदारी पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असताना त्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शहरवासीयांमधून केला जात आहे.

दरम्यान, डासांची उत्पत्ती वाढल्यामुळे हा आजार जडत असल्याचे नागरिकांसह खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टराचे म्हणणे आहे. सायंकाळी व सकाळच्या सुमारास डास मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. नगरपंचायतीच्या वतीने गुत्तेदारामार्फत नाल्यांची साफसफाई करण्यात येत असली, तरी केवळ मुख्य रस्त्यावरील नाले सफाई होते. इतरत्र साफसफाई करण्यात येत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नाल्या काढल्या, तर गाळ लवकर उचलला जात नाही. त्यामुळे हा गाळ पुन्हा नाल्यात जाऊन दुर्गंधी पसरत आहे, शिवाय शहरातून वाहत जाणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढल्यामुळे या भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याच्या पुलावर मासे विक्रेते बसत असल्याने येथून जाताना-येताना दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे या विक्रत्यांना स्वतंत्ररीत्या जागा उपलब्ध करून देण्याची गरजही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

‘डोअर टू डोअर’ आरोग्य तपासणी

शहरातील शिवशक्तीनगर भागात गेल्या महिन्यात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी भेट देऊन आरोग्य तपासणी करण्यात आली होती, शिवाय नगरपंचायतीकडे आरोग्य विभागाचे मनुष्यबळ नसल्यामुळे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी मदतनिसांना सोबत घेऊन अ‍ॅबेटिंगही केले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी गोवर्धन महिंद्रकर यांनी सांगितली. डासाची उत्पत्ती वाढू नये व साथरोग पसरू नयेत, यासाठी नगरपंचायतीच्या वतीने धूर फवारणी अथवा नाल्यावर बीएचसी पावडरची फवारणी गरजेचे असल्याचेही डॉ.महिंद्रकर म्हणाले.

कोट.....

चिकनगुनियासदृश्य आजाचे रुग्ण असल्यास, त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील नॉन कोविड विभागात उपचारासाठी यावे. येथी सर्व प्रकारच्या औषधी उपलब्ध आहेत, तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी कोरोनासदृश्य रुग्ण आढळून आल्यास, त्यांना तत्काळ कोरोना चाचणीसाठी कोविड केअर सेंटरला पाठवावे. याकडे कुणी दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

- डॉ.कपिलदेव पाटील, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, वाशी

कोट.......

नगरपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने ज्या भागात चिकनगुनियासदृश्य रुग्ण आढळून आले आहेत, त्या भागात जाऊन फवारणी करून अ‍ॅबेटिंग केली आहे, तसेच डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी फवारणी करण्यात येत असून, धूर फवारणी करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. ज्या भागात चिकनगुनियासदृश्य रुग्ण आढळून येतील, त्या भागातील नागरिकांनी नळास पाणी येण्याच्या आगोदर आपले पाणीसाठे नष्ट करावेत.

- गिरीश पंडित, मुख्याधिकारी, नगर पंचायत

Web Title: Vashikar suffers from Chikungunya-like disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.