पिडीत न्यायापासून वंचित; कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरकारी वकीलाविरूद्ध ॲट्राॅसिटीचा गुन्हा
By बाबुराव चव्हाण | Published: March 18, 2023 02:44 PM2023-03-18T14:44:08+5:302023-03-18T14:44:51+5:30
जाणीवपूर्वक ॲट्राॅसिटी प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगाच्या निर्देशाने गुन्हा दाखल
धाराशिव -जातीय द्वेष भावना मनात ठेवून पीडित मागासवर्गीय कुटुंबाला न्यायापासून वंचित ठेवल्याच्या आराेपावरून धाराशिव जिल्हा न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील शरद जाधवर यांच्याविरूद्ध आनंदनगर पाेलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील लहु रामा खंडागळे यांचा मुलगा विकास व गावातीलच अमाेल मारूती काेळगे व इतर आठ जणांमध्ये क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वाद झाला हाेता. या वादानंतर विकासला ग्रामपंचायत कार्यालय तसेच समाज मंदिरात संबंधितांनी मारहाण केल्याप्रकरणी विकास याने बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. संबंधित तक्रारीच्या आधारे मारहाण करणार्यांविरूद्ध अँट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला हाेता. गुन्ह्याचा तपास करून बेंबळी पाेलिसांनी धाराशिव येथील न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले हाेते.
संबंधित प्रकरणाला स्पेशल अँट्रॉसिटी ०६/२०१५ असा क्रमांक मिळाला होता. दरम्यान, हे प्रकरण सुनावणीसाठी न्यायालयासमाेर आल्यानंतर सरकारी वकील म्हणून सचिन सूर्यवंशी यांची नेमणूक करण्यात आली हाेती. मात्र, सुनावणी सुरू असताना हे प्रकरण जाधवर यांच्याकडे वर्ग झाले. तेव्हापासून त्यांनी या प्रकरणामध्ये आमच्याबद्दल जातीय द्वेष भावना मनात ठेवून दुर्लक्ष केले. सुनावणीवेळी व युक्तीवादा वेळीही जाधवर हे गैरहजर राहिले. त्यामुळे १० डिसेंबर २०२१ राेजी हे प्रकरण अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने निकाली काढत सर्व आराेपींना निर्दाेष मुक्त केले, असे खंडागळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, सरकारी वकील शरद जाधवर यांनी आपले कर्तव्य योग्यरित्या पार न पाडल्याने तक्रारदार लहू खंडागळे यांनी महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगात धाव घेतली हाेती. आयाेगाच्या अध्यक्षांनी कर्तव्यात कसूर केल्याबाबत सरकारी वकील जाधवर यांच्याविरूद्ध अनूसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले हाेते. विधी व न्याय विभागानेही जाधवर यांच्याविरूद्ध कारवाई करण्याबाबतचे पत्र नाेव्हेंबर २०२२ मध्ये जिल्हा पाेलीस अधीक्षक यांना दिले हाेते. या सर्व पत्रव्यवहाराचा गांभीर्याने विचार करून जाधवर यांच्याविरूद्ध कठाेर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी विनंती खंडागळे यांनी केली हाेती. त्यानुसार शुक्रवारी रात्री साधारपणे साडेनऊ वाजेच्या सुमारास आनंदनगर पाेलीस ठाण्यात जाधवर यांच्याविरूद्ध ॲट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा नाेंद झाला.