Video : '...आली साहित्याची वारी'; ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थीम सॉंग ऐकले का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 06:57 PM2020-01-01T18:57:54+5:302020-01-01T19:00:13+5:30
१० ते १२ जानेवारीदरम्यान फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन होत असून, ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर संमेलनाचे उद्घाटक आहेत
उस्मानाबाद : ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रचार, प्रसाराच्या अनुषंगाने पहिल्यांदाच थीम सॉंगचा प्रयोग करण्यात आला असून, बुधवारी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते हे गीत राज्यातील १२ जिल्ह्यात एकाचवेळी येथील आकाशवाणी केंद्रातून प्रसृत करण्यात आले.
१० ते १२ जानेवारीदरम्यान फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन होत असून, ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर संमेलनाचे उद्घाटक आहेत, तसेच ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजन स्थळाला ‘संत गोरोबा काका साहित्यनगरी’ असे नाव देण्यात आले असून, शाहीर अमर शेख साहित्य मंच, सेतू माधवराव पगडी साहित्य मंच व दत्तोअप्पाजी तुळजापूरकर साहित्य मंच, असे तीन भव्य मंडप उभारण्यात आले आहेत.
असे आहे संमेलनाचे वेळापत्रक :
१० रोजी स. ९ वा. तुळजाभवानी क्रीडा संकु ल येथून ग्रंथदिंडी निघून संमेलनाची सुरुवात होईल. स. ११ वा. ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. यानंतर मावळत्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. दु. ३.३० वा. तुळजापूर येथील कलावंत पारंपरिक गोंधळ सादर करणार असून, सायं. ४ ते ७ या वेळेत शाहीर अमर शेख साहित्य मंचावर संमेलनाचा उद्घाटन सोहळा रंगेल. सायं. ७.३० ते रात्री १०.३० या वेळेत मुंबई येथील कवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन, तर दत्तोअप्पाजी तुळजापूरकर मंडपात इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते कविकट्ट्याचे उद्घाटन होईल.
दि.११ रोजी शाहीर अमर शेख साहित्य मंचावर स. ९.३० वा. डॉ. दासू वैद्य आणि सारंग दर्शने लेखिका प्रतिभा रानडे यांची प्रकट मुलाखत घेतील.
स. ११ वा. डॉ. सुषमा करोगल यांच्या अध्यक्षतेखाली ‘आजचे भरमसाठ कवितालेखन : बाळसं की सूज’ या विषयावर परिसंवाद होईल. दु. २ वा. सतीश तराळ यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होईल. याच दिवशी सेतू माधवराव पगडी साहित्य मंचावर स. ९.३० वा. शालेय विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. स. ११ वा. प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवन जाणिवा’ या विषयावर, तर दु. २ वा. श्रीराम शिधये यांच्या अध्यक्षतेखाली ‘एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?’ या विषयावर, सायं. ५ वा. ‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजी प्रस्थ वाढते आहे’ या विषयावर ह.भ.प. राम महाराज राऊत यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल.
दि.१२ रोजी स. ९.३० ते १२ वा. शाहीर अमर शेख साहित्य मंचावर 'संवाद : आजच्या लक्षवेधी कथालेखकांशी', दु. २ ते ४ परिचर्चा : शेतकऱ्याचा आसूड : महात्मा फुले, याच दिवशी सेतू माधवराव पगडी साहित्य मंचावर परिसंवाद : आजचे सामाजिक वास्तव आणि मराठी लेखक, दु. निमंत्रितांचे कविसंमेलन व दु. २ ते ५.३० वाजे दरम्यान बालकुमार मेळावा होईल. समारोप सेतू माधवराव पगडी साहित्य मंचावर सायं ५ ते ७ या वेळेत समारोप होईल.
काही नवीन उपक्रम होणार
बालाजी सुतार यांच्या वतीने सादर केला जाणारा ‘गावकथा’चा प्रयोग, म. फुले यांच्या ‘शेतकऱ्यांचा असूड’ या ग्रंथावर अभ्यासकांची परिचर्चा आणि पाच लक्षवेधी कथाकरांशी अरविंद जगताप आणि राम जगताप यांचा प्रकट संवाद हे नवीन उपक्रम या संमेलनात होणार आहेत.