ढोकीत पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; हंडे घेऊन केला रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 04:07 PM2019-01-24T16:07:59+5:302019-01-24T16:21:20+5:30

चार गावांतील सुमारे पाचशेवर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ढोकी येथे रास्तारोको केला.

Villagers aggressor for water at Dhoki | ढोकीत पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; हंडे घेऊन केला रास्तारोको

ढोकीत पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; हंडे घेऊन केला रास्तारोको

googlenewsNext

ढोकी (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील ढोकी, कसबे तडवळे, येडशी आणि तेर या चार गावांसाठी राबविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी उपरोक्त चार गावांतील सुमारे पाचशेवर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ढोकी येथे रास्तारोको केला. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे सुरेश पाटील यांनी केले.

गुरुवारी सकाळी दहा वाजता ढोकी, येडशी कसबेतडवळे आणि तेर  या चार गावांतील ग्रामस्थ हातामध्ये पालथ्या घागरी घेऊन ढोकी बस स्थानकावर एकत्र आले.  येथून हे ग्रामस्थ गगणभेदी घोषणा देत ढोकी पेट्रोलपंप चौकामध्ये दाखल झाले. येथे दोखल झाल्यानंतर लातुर-बार्शी व कळंब-तेर या चौरस्त्यावर ग्रामस्थांनी ठिय्या दिला. त्यामुळे उपरोक्त सर्वच मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.  यानंतर सुरेश पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तेरणा प्रकल्पावरून राबविण्यात आलेली परंतु, सध्या बंद अवस्थेत असलेली पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून १७ जानेवारी रोजी स्वतंत्र परिपत्रक काढले आहे.

दुष्काळग्रस्त भागातील थकित विज बिलामुळे बंद आसलेल्या पाणी योजना एकूण बिलाच्या पाच टक्के रक्कम भरून  सुरू कराव्यात व व नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ या आठ महीन्याच्या कालावधीतील वीजबिल भरता यावे, यासाठी जिल्हानिहाय निधी मंजूर केला आहे. यामध्ये उस्मानाबाकरिता १ कोटी रुपये रूपये मंजूर आहेत. सदरील निधी उपयोगात आणून तातडीने योजना कार्यान्वित करणे गरजेचे आहे. परंतु, सध्या तसे होताना दिसत नाही. संबंधितांच्या दुर्लक्षित कार्यपद्धतीचा उपरोक्त चार गावांना फटका बसत असल्याचे ते म्हणाले. ग्रामस्थांची टंचाईच्या जोखडातून सुटका करण्यासाठी जिल्हा परिषद व जीवन प्राधिकरण विभागाने युद्धपातळीवर वीजबिल भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी  तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर, ढोकीचे उपसरपंच अमोल समुद्रे पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, येडशीचे माजी सरपंच विजय सस्ते, गजानन नलावडे, नासेर शेख, आयुब पठाण यांनीही मार्गदर्शन केले. आंदोलनप्रसंगी ढोकीचे सरपंच नाना चव्हाण, कसबेतडवळे सरपंच किरण आवटे, येडशीचे सरपंच गोपाळ नागटीळक, माजी उपसरपंच अमर समुद्रे, राजाभाऊ लोंढे सुनिल शिंदे, पांडुरंग वाकुरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी जीवन प्राधिकरण विभागाचे उपअभियंता बुरडे व मंडळ अधिकारी कुलकर्णी यांनीे मागणीचे निवेदने स्विकारले.  

रूग्णवाहिकेसाठी केला मार्ग मोकळा
ढोकी पेट्रौपंप चौरस्ता येथे चारही गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. चारही बाजुंनी वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. असे असतानाच लातूरकडे जाण्यासाठी रूग्णवाहिका तेथे आली. थोडाही विलंब न करता आंदोलनात सहभागी आंदोलकांनी रूग्णवाहिकेला मार्ग मोकळो करून दिला.

Web Title: Villagers aggressor for water at Dhoki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.