डाॅक्टरांना निरोप देताना ग्रामस्थांचे डोळे पाणावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:33 AM2021-02-16T04:33:31+5:302021-02-16T04:33:31+5:30
कळंब : कोंबडं आरवण्याच्या समयी गाडीची फडफड कानी पडली की लोक समजायचे खाब्या डॉक्टरांचा राऊंड सुरू झाला. खामसवाडी ...
कळंब : कोंबडं आरवण्याच्या समयी गाडीची फडफड कानी पडली की लोक समजायचे खाब्या डॉक्टरांचा राऊंड सुरू झाला. खामसवाडी पंचक्रोशीतील नागरिकांना परिचित झालेली ही दिनचर्या व सवारी असयाची ती डॉ. खाबिया यांची. तब्बल ४५ वर्षे विसेक गावातील चार पिढ्यांना त्यांची ‘दवा’ कामी आली. गावकऱ्यांनीही त्यांना प्रेमरूपी ‘दुवा’ तितकीच दिली. यामुळे त्यांना निरोप देताना खामसरवाडीकरांचेही डोळे पाणावले होते.
दुष्काळाच्या चटक्यात होरपळलेल्या काळात साल १९७३ मध्ये विदर्भातील माणिकवाडा (ता. पुसद जि. यवतमाळ) येथील डॉ. रमेशचंद्र उत्तमचंद खाबिया यांनी वैद्यकीय सेवा देण्यासाठी आपलं ‘वऱ्हाड’ प्रांतातील ‘बिऱ्हाड’ खामसवाडीत टेकविले. खामसवाडी व लगतच्या मोहा, मंगरूळ, गोविंदपूर, नागझरवाडी, एकूरका, बोर्डा, खेर्डा आदी विसेक गावात त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. भल्या पहाटे उठणे अन् गाडी घेऊन सकाळीच खेडेगावात राऊंड करत पुढं खामसवाडीकरासाठी उपलब्ध राहणे, हा त्यांचा दिनक्रम. यामुळे त्यांची गाडी, तिची फायरिंग व त्यावर बसलेली ही प्रकृती हे साऱ्या पंचक्रोशीत परिचयाचं झालं होतं. प्रत्येक घरात ओळख झालेल्या या डॉक्टरांनी नुकतीच ४५ वर्षानंतर आपल्या सेवेस पूर्णविराम दिला. आपली मुलं विदर्भात स्थिरस्थावर आहेत. पत्नीच्या निधनानंतर खचलेल्या डॉक्टरांनी उतारवय जन्मगावी घालवावे असा निर्णय घेतला. यानुसार त्यांना ग्रामस्थांनी प्रेमपूर्वक सस्नेह निरोप दिला.
चौकट....
नाममात्र शुल्क, परत मायेचा आधार...
खामसवाडी येथील खाबिया डॉक्टरांनी नाममात्र रुपयात रुग्णांची तपासणी केली. यातच औषधीही देत. सध्याही ते दहा रुपयेच घेत. आयुष्यभर रुग्णसेवा करताना त्यांनी पैसा नाही तर असंख्य माणसं कमावली. पेशन्टला पुढं जाण्याचा सल्ला देताना गरजेनुरूप खिशात पैसैही घालत. मायेचा आधार देत, शब्दांचा धीर देत.
‘त्यांना’ भावना आवरता आल्या नाहीत
डॉ. खाबिया यांनी खामसवाडी येथील सेवायज्ञात आयुष्याची ४५ वर्षांची आहुती दिली. यानंतर राष्ट्रवादी वक्ता सेलचे प्रा. सुशील शेळके, तुरुंग अधिकारी रामराजे चांदणे यांनी गावात निरोप समारंभ आयोजित केला. या ठिकाणी तेरणाचे माजी संचालक त्र्यंबक शेळके, दिलीप पाटील यांचीही उपस्थिती होती. यावेळी डॉक्टरांच्या कार्याला अनेकांनी उजाळा दिला. चार पिढ्यांचे डॉक्टर असलेल्या खाबिया यांच्या निरोपाप्रसंगी मने सुन्न झाली, काहींचे डोळे पाणावले.