रस्ता दुरुस्तीसाठी तीन गावच्या ग्रामस्थांनी महामार्ग रोखला
By गणेश कुलकर्णी | Published: September 23, 2023 03:47 PM2023-09-23T15:47:01+5:302023-09-23T15:47:27+5:30
पारगावनजीक तासभर वाहतूक खोळंबली
धाराशिव : वाशी तालुक्यातील पारगाव सर्कलअंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी, यासह अन्य मागण्यांसाठी पारगाव येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर माजी उपसरपंच डॉ. अनंत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पारगाव, जनकापूर आणि दहीफळ या तीन गावच्या ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.
वाशी तालुक्यातील पारगाव ते जनकापूर, पारगाव ते गिरवली, राष्ट्रीय महामार्ग ते दहीफळ, दहीफळ ते तांदुळवाडी, जनकापूर ते वायसे वस्ती, पवार वस्ती, बाराते वस्ती या रस्त्यांची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, शेतकरी, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच पारगावातील अंतर्गत नाल्यांची दुरुस्ती व नवीन रस्ते आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांचे निवेदन मंडळ अधिकारी शिवाजी उंदरे यांनी स्वीकारले.
आंदोलनात शिवसेना (उबाठा) गटाचे शाखा प्रमुख बालाजी गिराम, रामभाऊ शिंगठे, गोपीनाथ शिंगठे, अंकुश शिंगठे, अंगद शिंगठे, गौतम वायसे, रखमाजी पवार, कृष्णा पवार, अशोक मोटे यांच्यासह परिसरातील गावचे नागरिक सहभागी झाले होते. वाशीचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार ससाणे, पारगावचे बीट अंमलदार राजू लाटे व त्यांचे सहकारी, पोलिस पाटील अमर पाटील, तलाठी किशोर उंदरे यांचीही यावेळी उपस्थिती होती.