Vinayak Mete: महिना 30 रुपये भाडं, हातानेच करायचे स्वयंपाक; मित्राने सांगितलं मेटेचं शालेय जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 03:15 PM2022-08-17T15:15:39+5:302022-08-18T15:34:50+5:30
शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा संघर्षशील नेतृत्व विनायकराव मेटे यांचे मुंबई पुणे महामार्गावर पहाटे अपघाती निधन झाले
बालाजी अडसूळ
उस्मानाबद/कळंब - तीस रूपये महिन्याकाठी भाडे मोजाव्या लागणार्या पत्र्याच्या खोलीत, हातांने स्वयंपाक करत दिवंगत विनायक मेटे यांनी आपल्या गावातील चार संवगड्यासह कळंब शहरात शिक्षणासाठी दोन वर्षाचा मुक्काम ठोकला होता. यासह दुसऱ्या अनेक प्रसंगात कळंबकरांना सहवास लाभलेल्या मांजराकाठच्या या संघर्षशील नेतृत्वाच्या अपघाती मृत्यूच्या वार्तेनं वेगळीच हुरहूर लागल्याचे दिसून आले.
शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा संघर्षशील नेतृत्व विनायकराव मेटे यांचे मुंबई पुणे महामार्गावर पहाटे अपघाती निधन झाले. विविध संघटना, आरक्षण चळवळ, मराठवाडा लोकविकास फोरम यासह विविध चळवळीत, राजकारण व समाजकारणातील व्यक्तिंसाठी 'मेटे साहेब' गेल्याची ही बातमी सुन्न करणारी होती. याचप्रमाणे कळंबकरांसाठी पण ती तितकीच धक्कादायक अन् 'ब्लॅक संडे' ठरली. कारण, विनायक मेटे यांचे राजेगाव ता. केज हे गाव जिल्हा सरहद्दीवर कळंबपासून २२ तर इटकूरपासून १२ तर बहुल्यापासून केवळ दोन किमी. बहुला अन् राजेगावच्या मधूनच मांजरा नदी प्रवाही होत्या. त्यामुळेच राजेगाव अन् विशेषतः विनायकराव मेटे यांचा कळंबशी निकटचा संबंध आलेला.
विद्याभवन शाळेत गिरवले धडे...
बीड जिल्हा हद्दीवरील केज तालुक्यातील पिंपरी, नाहोली, राजेगाव, बोरगाव ही गावे शिक्षण व बाजारपेठेसाठी कळंबलाच कनेक्ट होती. यामुळेच सातवीपर्यंत राजेगावच्या जिप शाळेत शिकलेल्या विनायक मेटें यांनी आठवीत कळंब येथील विद्याभवन शाळेत प्रवेश घेतला. येथे दोन वर्ष काढत पुन्हा नाहोलीत दहावी काढली. साधारणतः १९८४ च्या दरम्यान ते कळंब येथे शिक्षणासाठी वास्तव्यास होते.
भाड्याची खोली, हाताने स्वयंपाक...
दिवंगत विनायक मेटे कळंब येथील पत्की वाडा व मानकर वाडा येथे किरायाच्या खोलीत सवंगडी शिवाजी मेटे, नारायण जाधव, फुलचंद मेटे, रामहरी मेटे यांच्यासह वास्तव्य करत होते. यासाठी पत्र्याच्या खोलीत तीस रूपये मासीक भाडे मोजत हाताने स्वयंपाक करावा लागत होता असे वर्गमित्र तथा 'रूम पार्टनर' असलेल्या शिवाजी मेटे यांनी सांगितले.
सात्र्याच्या पात्रात वाहताना वाचवले...
शिवाजी मेटे सांगतात विनायक धाडसी, साहसी होते. अंगी नेतृत्वगुण, वक्तृत्व होते. आम्ही शनिवारी अर्धी शाळा बुडवून सात्रा, बोरगाव, नाहोली अशी पायपीट करत राजेगाव गाठायचो. सोमवारी परत फिरायचो. एकदा मांजराच्या पाण्यात आम्ही वाट काढत असताना वहिवाटलो. उंच्यापुऱ्या विनायक बप्पांनी यात स्वतःला तर सावरले अन् मलाही बाहेर काढले. हा प्रसंग सांगताना शिवाजी मेटे यांना अश्रू आवरता आले नाहीत.
मांजरा काठचा, आमचा माणुस गेला... विनायक मेटे यांनी सातत्याने संघर्ष केला. मांजरा तीरावरील हे नेतृत्व याच संघर्षातून राज्यात ठसा उमटून होते. समाज व मराठवाडा यांच्या हितासाठी कायम झटणारा मांजराकाठचा आमचा वाटणारा माणूस गेल्याचे मोठे दुख आहे.
अॅड अनंत चोंदे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष ▪️
आमच्याकडे या, संघटनेला बळ द्या...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड दिलीपसिंह देशमुख व विनायक मेटे मराठा महासंघात काम करत होते. पुढं मेटेनी शिवसंग्राम काढला. यावेळी अॅड देशमूख यांना तुमची आमच्या चळवळीला गरज आहे. संघटनेत काम करा असे सुचवले होते. असे अॅड दिलीपसिंह देशमूख यांनी सांगितले.