व्हायरल सर्दी-तापाचे संकट, रुग्णालयांमध्ये वाढली मुलांची गर्दी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:39 AM2021-09-09T04:39:16+5:302021-09-09T04:39:16+5:30
उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून व्हायरल, सर्दी तापाचे रुग्ण वाढले आहेत. यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. जिल्हा रुग्णालयातील ...
उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून व्हायरल, सर्दी तापाचे रुग्ण वाढले आहेत. यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. जिल्हा रुग्णालयातील बाल रुग्ण कक्षाची ओपीडी वाढली आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे रिकामी डबकी, नाल्यांमध्ये पाणी साचले आहे. परिणामी, डासोत्पत्ती प्रमाण वाढले आहे. डासांच्या चाव्यामुळे डेंग्यू, मलेरियाचा आजार बळावला आहे. त्याचबरोबर दूषित पाण्यामुळे टायफाईडचे रुग्ण वाढले आहेत. बदलत्या वातावरणामुळे व्हायरल सर्दी-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. त्यात लहान मुलांचा अधिक समावेश आहे. जिल्हा रुग्णालयातील बाल रुग्ण विभागाचा आंतररुग्ण कक्ष व बाह्यरुग्ण कक्षात उपचारासाठी मुलांची गर्दी वाढली आहे. तर खासगी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी होत आहे.
ही घ्या काळजी
पावसात भिजणे टाळावे, थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घाला, आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा. उघड्यावरील खाणे टाळावे, तसेच पाणी गाळून उकळून प्यावे.
कोरोना नाही, डेंग्यूचेही संकट वाढले
कोरोनाचे रुग्ण काही दिवसांपासून कमी झाले असले तरी दुसरीकडे आता डेंग्यूने डोके वर काढले आहे. डेंग्यूसोबत मलेरियाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात असे रुग्ण दाखल होत आहेत.
लक्षणे आढळून आल्यास उपचार घ्यावे.
पाऊस सुरू झाल्यापासून डेंग्यू, मलेरिया, व्हायरल सर्दी, ताप, न्यूमोनिया, टायफाॅईडचे रुग्ण वाढले आहेत. ओपीडी व आयपीडी दोन्ही वाढली आहे. सर्दी, ताप अशी लक्षणे आढळून आल्यानंतर तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे.
आर. यू. बोराडे, बालरोग तज्ज्ञ
ओपीडी दुप्पटीने वाढली
जिल्हा रुग्णालयातील बाल रुग्ण विभागातील दररोज ३० च्या जवळपास ओपीडी असत. मात्र, मागील महिन्यापासून बालरुग्ण कक्षातील ओपीडी ६० च्या जवळपास गेली आहे. तर आयपीडीत ४० च्या जवळपास रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच शहरातील खासगी रुग्णालयात सर्दी, ताप, डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे असलेले बालके उपचार घेत असल्याचे दिसून येते.