जाती-धर्माच्या पलीकडील माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:26 AM2021-05-03T04:26:39+5:302021-05-03T04:26:39+5:30

मुरूम - कोरोनाचे सर्व मानवजातीवर संकट म्हणून उभे ठाकले असून सरकार व प्रशासन यावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना ...

A vision of humanity beyond caste-religion | जाती-धर्माच्या पलीकडील माणुसकीचे दर्शन

जाती-धर्माच्या पलीकडील माणुसकीचे दर्शन

googlenewsNext

मुरूम - कोरोनाचे सर्व मानवजातीवर संकट म्हणून उभे ठाकले असून सरकार व प्रशासन यावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना आखत आहे. पण निव्वळ सरकारवर अवलंबून न राहता आपणही समाजाचे देणे लागतो या उदात्त भावनेने खाजाभाई मुजावर हा मुस्लीम युवक आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने इदगाह काेविड केअर सेंटरमध्ये रात्रंदिवस कोरोना रुग्णाची सेवा करीत आहे. माणुसकीपुढे जाती धर्माच्या भिंती ढासळतात त्याची प्रचिती हा युवक आपल्या सेवाभावातून दाखवून देत आहे.

गेल्यावर्षी उमरगा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात जागा अपुरी पडू लागली. यावेळी मुस्लीम तरुणांनी पुढाकार घेत शहरातील गुंजोटी रोडलगत असलेल्या इदगाह मैदानातील फंक्शन हॉलमध्ये काेविड सेंटर सुरू करण्याबाबत पुढाकार घेतला. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले व तहसीलदार संजय पवार यांनी तत्काळ मंजुरी देत प्रतिसाद दिला. ऑगस्ट २०२० मध्ये हॉलचे तीस बेडचे एक उत्तम सुविधायुक्त कोविड सेंटरमध्ये परिवर्तन करण्यात आले. प्रशासनाच्या आधिपत्याखाली असले तरी देखभाल, जेवण व्यवस्था इतर सुविधा या पूर्णतः दानशूर लोकांच्या मदतीने सुरू होत्या. मधल्या काळात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने व रुग्ण संख्या कमी झाल्याने हे काेविड केअर सेंटर बंद करण्यात आले. परंतु, यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्यावर उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले व तहसीलदार संजय पवार यांनी मुस्लीम जमात कमिटीकडे इदगाह काेविड सेंटर सुरू करण्याची विनंती केली. १७ मार्चपासून हे काेविड सेंटर परत सुरू करण्यात आले. खाजाभाई मुजावर व त्यांचे सहकारी हे रात्रंदिवस तेथील रुग्णाची काळजी घेत असून त्यांच्या सोबतीला उपजिल्हा रुग्णालयातील एक वैद्यकीय पथक ही रात्रंदिवस तेथे आपली सेवा देत आहे.

पूर्णतः दानशूर दात्यांच्या बळावर हे काेविड सेंटर सुरू असून येथील सुविधा व रुग्णसेवा पाहून कोणतेही आवाहन न करता दानशूर या काेविड सेंटरला अन्नधान्य व आर्थिक मदत करीत आहेत. येथे खाजाभाई मुजावर हे आपले सहकारी कलीम पठाण, जाहेद मुल्ला, अजहर शेख, फैजल पटेल यांच्यासोबत रात्रंदिवस स्वयंसेवकांची भूमिका पार पाडत असून प्रत्येक जातीधर्माच्या रुग्णांना आपल्या सेवेच्या माध्यमातून माणुसकीचे दर्शन घडवीत आहेत. येथील प्रत्येक रुग्ण बरा होऊन जाताना खाजाभाई व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केल्याशिवाय जात नाही. त्यांची ही विनास्वार्थ सेवाभावी वृत्ती पाहून कित्येक रुग्णही घरी जाताना काेविड सेंटरला अन्नधान्याची मदत करीत असतात. जेणेकरून येथे राहणाऱ्या कोरोना रुग्णांना जेवणाची उत्तम सुविधा मिळेल.

काेविड सेंटरमध्ये रुग्णांना दररोज औषधोपचार व रुग्णांना सकस आहार दिला जातो. रोज सकाळी न्याहरी, दुपारी व रात्री जेवण दिले जाते. चिकन, अंडी याबरोबरच पालेभाज्या यांचा वापर असलेला आहार रोजच्या जेवणात असतो. ज्या रुग्णांना शाकाहारी वा मांसाहारी जेवण पाहिजे असेल त्यांना त्यानुसार जेवण दिले जाते.

उपजिल्हा रुग्णालयाने येथे कायमस्वरूपी वैद्यकीय पथक नेमले असून डॉ. वैभव शाईवाले, डॉ.अनिस शेख, नर्स महादेवी चव्हाण यांच्याबरोबरच सेवक मल्लिकार्जुन होळमजगे, राजू थोरात हेही येथे सेवा देत आहेत. गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून आजपर्यंत या काेविड सेंटरमधून ५५० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आम्ही आमचे कर्तव्य पार पाडत असून, प्रशासनाचे उत्तम सहकार्य व कोणतीही मदत न मागता दानशूर लोकांनी भरभरून मदत केली आहे. यामुळे हे शक्य होत आहे. यापुढेही आमचे कार्य असेच चालू असेल.

खाजाभाई मुजावर, समाजसेवक, (फाेटाे आहे.)

Web Title: A vision of humanity beyond caste-religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.