मूर्ती प्रतिष्ठापणनानिमित्त काक्रंब्यात जलयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:35 AM2021-08-22T04:35:16+5:302021-08-22T04:35:16+5:30
काक्रंबा : येथे हनुमान मंदिराचा कलशरोहण सोहळा व मूर्ती पुन:प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रम पार पडले. शुक्रवारी काढण्यात ...
काक्रंबा : येथे हनुमान मंदिराचा कलशरोहण सोहळा व मूर्ती पुन:प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रम पार पडले. शुक्रवारी काढण्यात आलेल्या जलयात्रेत शेकडो महिलांनी सहभाग नोंदविला. यावेळी सजवलेल्या बैलगाडीतून कलश मिरवणूक काढण्यात आली.
येथील हनुमान मंदिराचे बांधकाम सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचे आहे. सद्यस्थितीत मंदिराचा गाभा ढासळण्याच्या अवस्थेत होता. त्याचबरोबर भिंतीही फुगल्या होत्या. पावसाळ्यामध्ये गाभाऱ्यात गळती लागत होती. त्यामुळे येथील जय बजरंग भजनी मंडळाने पुढाकार घेऊन जवळपास १० लाख रुपये वर्गणी जमा करून हनुमान मूर्तीची पुन:प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण केले. यानिमित्त १८ ते २० ऑगस्ट या कालावधीत नंदी नामाचे १४ वे वंशज वेदशास्त्र संपन्न नागेश शास्त्री नंदीबुवा अंबुलगे, राजाराम शास्त्री, विठ्ठल शास्त्री अंबुलगे व इतर नऊ ब्रह्मवृंदांच्या हस्ते विधीवत मंत्रोच्चारात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्याचबरोबर कलशारोहण विधी तुळजापूरचे महंत मावजीनाथ बुवा यांच्या हस्ते करण्यात आला. शुक्रवारी सकाळी गावातून जलयात्रा काढण्यात आली. यावेळी विविध फुलांनी सजवलेल्या बैलगाडीतून कलश मिरवणूक काढण्यात आली. गावामध्ये प्रथमच जलयात्रा निघाल्याने महिलांसह तरुण, भजनी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून ग्रामस्थांनी जलयात्रेचे मोठ्या भक्तीभावाने स्वागत केले. या सोहळ्यानिमित्त गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
शुक्रवारी रात्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज कानोबा महाराज देहूकर यांच्या कीर्तनाने सलग तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौतम सोनटक्के, श्रीहरी ढेरे, किसन बंडगर, बापू जाधव, अमोल सुतार, नंदा ढेरे, पद्माराज गडदे, शिवाजी नंन्नवरे, राम कोळेकर, बालाजी कोळेकर, संपत सोनटक्के, समाधान हांडे, अनिल जाधव, सौदागर क्षीरसागर, समाधान सोनटक्के, विजय गडदे, राजेंद्र गडदे, नंदा ठवरे, खंडू गवळी, किरण शिंदे, बाळू बेडगे, गजेंद्र दळवे, अशोक कंदले, बालाजी पाटील, गणेश ढेकरे, संतोष सोनटक्के त्याचबरोबर मुक्ताई महिला भजनी मंडळ व जय बजरंग भजनी मंडळ यांनी पुढाकार घेतला.
210821\img-20210821-wa0049.jpg
काक्रंबा येथे निघालेली जेल यात्रा