गुडघाभर चिखलात शाेधावी लागतेय वाट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:20+5:302021-07-23T04:20:20+5:30
बाबू खामकर पाथरुड (जि. उस्मानाबाद) : भूम तालुक्यातील आनंदवाडी येथील खामकर वस्तीवरील नागरिकांसाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत ...
बाबू खामकर
पाथरुड (जि. उस्मानाबाद) : भूम तालुक्यातील आनंदवाडी येथील खामकर वस्तीवरील नागरिकांसाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत जवळपास गुडघाभर चिखलातून शेतकरी, ग्रामस्थांना ये-जा करावी लागत आहे. रस्त्याचे काम व्हावे, यासाठी शेतकरी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. परंतु, आजवर हा प्रश्न यंत्रणेने गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
भूम तालुक्यातील खामकर वस्ती ही आनंदवाडी ते नान्नजवाडी या रस्त्यावर आहे. एवढेच नाही तर शेकडो हेक्टर शेतशिवारही या रस्त्यालगतच आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. असे असतानाही खामकर वस्तीला जाेडणारा पक्का रस्ता नाही. उन्हाळा व हिवाळा अशा दाेन ऋतूंमध्ये फारसा त्रास हाेत नाही. परंतु, पावसाळा सुरू झाला की, या भागातील लाेकांना वस्ती साेडावीशी वाटते. त्याला कारणही तसेच आहे. रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला तरी किमान गुडघाभार चिखल तयार हाेताे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्रामस्थांना या मार्गावरून ये-जा करणे कठीण हाेते. मात्र, दुसरा पर्याय नसल्याने शेतकऱ्यांना सकाळी व संध्याकाळी दूध घेऊन गावात जावे लागते. अनेक वेळा चिखलामुळे घसरून शेतकरी, महिला जायबंदी हाेत आहेत. वस्तीवरील एखादी व्यक्ती आजारी पडल्यानंतर दवाखान्यात नेताना तर प्रचंड यातना साेसाव्या लागतात. या रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी परिसरातील शेतकरी, रहिवासी पाठपुरावा करीत आहेत; परंतु, आजवर त्यास यश आलेले नाही.
चाैकट...
१. भूम तालुक्यातील आनंदवाडी येथील खामकर वस्ती येथे जवळपास १२ कुटुंबे वास्तव्यास आहेत. ६५ ते ७० पशुधनही आहे. दररोज २०० लिटर दुधाचेही उत्पादन होते. मात्र पक्का रस्ता नसल्याने थोडाबहुत पाऊस झाला तरी प्रचंड चिखल तयार हाेताे. पशुधनासाठी लागणारा चाराही डाेक्यावर वाहून आणावा लागताे. अशा परिस्थितीत एखाद्या शेतकऱ्याचे पशुधन आजारी पडले तर डाॅक्टरही वस्तीवर येण्याचे टाळतात. रात्री-अपरात्री काेणी आजारी पडले तर दवाखान्यात अनंत अडचणींना ताेंड द्यावे लागते.
शेतमाल शेतातच भिजताे....
पक्का रस्ता नसल्याने खामकर वस्तीवरील ग्रामस्थांतील गैरसोय तर होतच आहे. शिवाय या रस्त्यालगतच्या शेकडो शेतकऱ्यांनाही पक्का रस्ता नसल्याने शेतात काढणीस आलेल्या शेतमालाची मळणी करण्यासाठी यंत्रदेखील चिखलातून येऊ शकत नाही. त्यामुळे शेतमाल शेतातच भिजताे, असे काही शेतकर्यांनी सांगितले.
अशी हाेऊ शकते तरतूद...
पक्का रस्ता नसल्याने खामकर वस्तीसह नान्नजवाडी, आनंदवाडी येथील शेकडो शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे हा रस्ता होणे अत्यावश्यक आहे. नान्नजवाडी ते आनंदवाडी या रस्त्याची जिल्हा परिषदेकडे नाेंद आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केल्यास मार्ग निघू शकताे अथवा राेजगार हमी याेजनेतून नान्नजवाडी ते जेजला रस्त्याचे काम करता येऊ शकते. यासाठी गरज आहे ती तीव्र इच्छाशक्तीची.
कायम म्हणताहेत शेतकरी...
शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही दुग्धव्यवसाय करतो; परंतु, आम्हाला ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे दररोजचे दूध हे चिखलाची वाट तुडवत गावात न्यावे लागते. हा प्रश्न लक्षात घेऊन रस्त्याचे काम मंजूर करावे, अशी मागणी आनंदवाडी येथील यादव खामकर यांनी केली आहे.
चिखलामुळे घसरून अनेक लाेक जायबंदी हाेत आहेत. अशा वेळी दूध सांडून नुकसानही हाेते. पशुधनासाठीचे खाद्यही आणता येत नाहीत. त्यामुळे लाेकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आनंदवाडी येथील बायजाबाई खामकर यांनी केली आहे.
पक्का रस्ता नसल्याने पिकांची मळणी करण्यासाठी यंत्र शेतात आणता येत नाही. परिणामी जास्तीचा पाऊस झाल्यानंतर पीक वाया जाते. त्यामुळे लाेकप्रतिनिधींनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन रस्ता मंजूर करावा, अशी मागणी आनंदवाडी येथील सचिन खामकर व नान्नजवाडी येथील शेतकरी सदाशिव माने यांनी केली.