१०८ रुग्णवाहिकेसाठी वेटिंग; दररोज २५० वर काॅल्स!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 07:05 PM2021-04-22T19:05:02+5:302021-04-22T19:05:27+5:30
रुग्ण वाहिकेत ‘बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टम’ आणि अद्ययावत वैद्यकीय उपचार उपकरणांचा समावेश आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत १०८ क्रमांकाच्या १५ रुग्णवाहिका असून, दररोज २५० च्या वर काॅल्स येतात. कोरोना रुग्णांबरोबरच इतर रुग्णांचे प्रमाणही वाढल्यामुळे बराच वेळ रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागत आहे.
आपत्कालीन स्थितीत रुग्णास उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. गोल्डन अवरमध्ये रुग्णांना तातडीने उपचार मिळावे, यासाठी शासनाने १०८ क्रमांकाची सेवा सुरू केली आहे. त्याचबरोबर आता कोरोना रुग्णांनाही रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेवर भार वाढला आहे.
जिल्ह्यात अशा १५ रुग्णवाहिका धावतात. रुग्ण वाहिकेत ‘बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टम’ आणि अद्ययावत वैद्यकीय उपचार उपकरणांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यात २ हजार ६५८ प्राण वाचविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. फोन आल्यानंतर २० ते ३० मिनिटांत रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचते व रुग्णास तातडीने रुग्णालयात दाखल केले जाते. जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्णांना लातूर, अंबेजोगाई, सोलापूर या ठिकाणी रुग्णवाहिकेतून पोहोचविले जात असल्याचे समन्वयक जयराम शिंदे यांनी सांगितले.
काॅल केल्यानंतर अर्ध्या तासात रुग्णवाहिका हजर
शहरातून काॅल आल्यानंतर १० ते १५ मिनिटांत रुग्णवाहिका हजर होते; परंतु शहराच्या बाहेरुन काॅल आल्यानंतर अर्धा तास लागतो. कधी कधी रुग्णवाहिकेला काॅल केल्यानंतर वेटिंगवर राहावे लागते. अशावेळी जीव कासावीस होतो. रुग्णांची स्थिती पाहून वारंवार फोन करावा लागतो. नातेवाइकांनी रुग्णांकरिता बेड शिल्लक आहेत का? याची शहानिशा करावी त्यानंतरच काॅल केल्यास रुग्णांची गैरसोय होणार नाही.
रुग्णवाहिकेची मागणी
जिल्ह्यासाठी सद्यस्थितीत १५ रुग्णवाहिका आहेत. रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात रुग्णवाहिकेची संख्या वाढविणे गरजेचे आहे. अनेकदा रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे नातेवाइकांना इतर रुग्णवाहिकेचा शोध घ्यावा लागतो.
जिल्ह्यातील एकूण १०८ रुग्णवाहिका : १५
ग्रामीण भागातून येणारे काॅल्स : ६८ %
शहरातून येणारे काॅल्स २२ %
कोणत्या महिन्यात किती रुग्णांची वाहतूक
महिना कोरोना इतर
जानेवारी २०२ ६०३
फेब्रुवारी १७१ ५८२
मार्च ७०५ ३९५