भोसले वस्ती शाळेच्या भिंती झाल्या बाेलक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:53 AM2021-05-05T04:53:37+5:302021-05-05T04:53:37+5:30
परंडा : औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड ...
परंडा : औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी सुंदर माझे गाव, सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत तांदूळवाडी केंद्रांतर्गतच्या भोसले वस्ती शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. पहिली ते चाैथीच्या वर्गातील उपयुक्त माहिती संबंधित भिंतीवर उतरविल्याने विद्यार्थ्यांची गैरसाेय दूर हाेईल.
आपण ज्या कार्यालयात काम करताे, ते कार्यालयही स्वच्छ व सुंदर असल्यास प्रसन्न वाटते. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. हीच बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात ‘सुंदर माझे गाव, स्वच्छ माझे कार्यालय’ हा उपक्रम सुरू कण्यात आला आहे. या उपक्रमात सर्व कार्यालयांनी सहभाग नाेंदवावा, असे आवाहन करण्यात आले हाेते. त्यानुसार परंडा तालुक्यातील तांदूळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप शिंदे यांनी तब्बल १० दिवस परिश्रम घेऊन व्हरांड्यासह दोन्ही वर्ग खोल्यांचे रंगकाम पूर्ण केले आहे. हे करीत असताना इयत्ता पहिली ते चौथीच्या पुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित सर्व विषयांतील सर्व वर्गांचे मूळ संबोध आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती निवडून सुंदर हस्ताक्षरातील सुविचार, चित्रयुक्त चार्ट, पाढे, भौमितिक आकृत्या, महाराष्ट्र - जिल्हा नकाशे, कालचक्र, शिवाजी महाराजांचा जीवनपट आदी उपयुक्त माहिती शाळेच्या भिंतीवर रेखाटली गेली आहे. त्यामुळे शाळेच्या भिंतीही आता बोलू लागल्या आहेत.
केंद्रप्रमुख बऱ्याचअंशी शाळा व शिक्षकांना मार्गदर्शन करतात. उणिवा शोधताना दिसतात. परंतु, केंद्रप्रमुख दिलीप शिंदे यांनी याला फाटा देत भोसले वस्ती शाळेचे सहशिक्षक किरण बनसोडे यांना सोबत घेऊन स्वत: शाळा रंगरंगोटीसाठी परिश्रम घेतले. केंद्रप्रमुख शिंदे यांनी शाळा रंगरंगोटी करून कामाचा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संभाजी मगर, मुख्याध्यापक वैजीनाथ सावंत यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मान केला. यावेळी किरण बनसोडे, प्रहार जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, परंडा तालुका उपाध्यक्ष शहाजी झगडे, तालुका नेते लक्ष्मण औताडे आदी उपस्थित हाेते.