कथेतून भिंती सांगताहेत जमीन व्यवहाराचे कायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:34+5:302021-06-09T04:40:34+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय हे शेतकरी, शेतजमिनींचा जणू आत्माच. विविध कामांसाठी येथे शेतकऱ्यांचा नियमित फेरा असतो. मात्र, यातील अनेक शेतकऱ्यांना ...

The walls of the story tell the laws of land transactions | कथेतून भिंती सांगताहेत जमीन व्यवहाराचे कायदे

कथेतून भिंती सांगताहेत जमीन व्यवहाराचे कायदे

googlenewsNext

जिल्हाधिकारी कार्यालय हे शेतकरी, शेतजमिनींचा जणू आत्माच. विविध कामांसाठी येथे शेतकऱ्यांचा नियमित फेरा असतो. मात्र, यातील अनेक शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या कायद्यांची माहितीच नसते. त्यामुळे व्यवहार करताना अनेकदा फसवणूक होऊन सामान्य शेतकऱ्यांच्या वाट्याला कोर्ट-कचेरीचे हेलपाटे येतात. ते थांबविण्यासाठी व कायदेविषयक साक्षरता रुजविण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पूर्ण कार्यालयभर कायद्यांची कथारुपी माहिती फ्रेम करुन लावण्याची सूचना केली. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या गोष्टीरुप जमीन व्यवहार निती या पुस्तकातील निवडक ४२ कथांचे व त्यातील कायदेशीर तरतुदींचे फ्रेम तयार करण्यात आले आहेत. हे फ्रेम रंगीत स्वरुपात असल्याने प्रत्येकाचे त्याकडे लक्ष जाते. त्यावर शेतकऱ्यांचा चित्ररुप संवादही दर्शविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीच्या व्यवहाराची माहिती सहज व सोप्या शब्दात कळण्यास मदत होत आहे. सध्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर माझे कार्यालय हे अभियान सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून हा उपक्रम राबविण्याची सूचना जिल्हाधिकार्यांनी केल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी त्यास मूर्त स्वरुप दिले. या फलकावर गोष्टीरुपात दिलेली माहिती मोजक्या व प्रभावी शब्दांत मांडण्यात आलेली आहे. आठ ते दहा ओळींचीच ही कथा आहे. ही कथा संपल्यानंतर तात्पर्य म्हणून त्यातून निघणारा बोध ठळक अक्षरात अधोरेखित करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संबंधित कायद्याची माहिती पटकन होते, असे शिवकुमार स्वामी म्हणाले.

कोट...

गावागावात जमिनीची खरेदी-विक्री, कर्जासाठी गहाणखत, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण, भाऊबंदकीतील वाद, जमिनीची वाटणी, फेरफार, सावकारी व्यवहार, कर्ज प्रकरणे, जमिनीचे तुकडे करणे असे व्यवहार नियमित सुरुच असतात. याबाबतचे काही नियम व कायदेही आहेत. हेच कायदे गोष्टी स्वरुपात मांडण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी या गोष्टीरुप नीतीचे वाचन अवश्य करावे. त्यातून जमीन व्यवहाराच्या कायद्याची माहिती मिळेल व बोधही होईल.

- कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी

Web Title: The walls of the story tell the laws of land transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.