‘पाहिजे’ असलेला आरोपी सहा वर्षानंतर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:31 AM2020-12-31T04:31:02+5:302020-12-31T04:31:02+5:30
अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा उस्मानाबाद : तालुक्यातील बावी फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर गणेश पंडित पारखे (रा. केज, जि. बीड) यांनी ...
अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा
उस्मानाबाद : तालुक्यातील बावी फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर गणेश पंडित पारखे (रा. केज, जि. बीड) यांनी कार क्रमांक (एमएच २५/ डीजे ६६७२) ही निष्काळजीपणे चालवून सिकंदर शेख हे चालवत असलेल्या अशोक लेलँड या वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात चालक शेख यांचा मृत्यू झाला तर त्यांचे सहप्रवासी सय्यद इनूस सय्यद अब्दुल (रा. सांगवी, ता. उस्मानाबाद) हे गंभीर जखमी झाले. ही घटना १२ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी इनूस सय्यद यांनी २८ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाहनाच्या धडकेत दोघे गंभीर जखमी
उस्मानाबाद : वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना २७ डिसेंबर रोजी तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे घडली. इराप्पा उमेश सारवाड याने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकी (एमएच १३/ सीएक्स ०४३७)ला पाठीमागून जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील औदुंबर बळीराम चौगुले व महेश हणमंत कदम (दोघे रा. पिंपळा खु.) हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चौगुले यांच्या फिर्यादीवरुन तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सफाई कामगारांच्या मागण्यांबाबत निवेदन
उस्मानाबाद : सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी काठीयावाडी मेहतर (रूखी) समाज विकास मंडळाने पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामध्ये सफाई कामगारांना सरकारी घरे द्यावीत, वारसा हक्क नियुक्ती, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ, कामगारांची दर सहा महिन्यांनी वैद्यकीय तपासणी तसेच दर तीन महिन्याला बैठक घेण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष शशिकांत परमार, सचिव महेश कबीर, कार्याध्यक्ष विकी वाळा आदींच्या सह्या आहेत.
जिल्हाध्यक्षपदी सचिन सरवदे
उस्मानाबाद : कास्ट्राईब दिव्यांग विभाग शिक्षक व कर्मचारी संघटनेची जिल्हा शाखा उस्मानाबाद येथे स्थापन करण्यात आली असून, अध्यक्षपदी सचिन सरवदे तर सचिवपदी शहाजी चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेश तांबे, कार्याध्यक्ष तुषार भालेराव उपस्थित होते. या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सरवदे यांनी सांगितले. या बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. हणमंत मलाव यांनी केले.
महाविद्यालयात रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर
भूम : येथील शंकरराव पाटील महाविद्यालयातील रासेयो विभागाच्यावतीने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३४ दात्यांनी रक्तदान केले तसेच ६० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य शाहू बोराडे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंदनशिव श्रीकृष्ण होते. शिबिराला भगवंत ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, प्रवीण नवले, विजय तोडकरी, शबाना पठाण, आकांक्षा कदम, ग्रामीण रुग्णालयातील महालॅबचे पवन देवरे व नवनाथ चव्हाण यांनी सहकार्य केले. याबद्दल प्रा. तानाजी बोराडे व प्रा. अशोक दुनघव यांनी त्यांचा सत्कार केला. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. संतोष शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा. गौतम तिजारे, आदींनी पुढाकार घेतला.
देशी दारू जप्त
लोहारा : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक २८ डिसेंबर रोजी तालुक्यातील माळेगाव येथे छापा टाकला. यावेळी बबन रामराव सूर्यवंशी हा ‘मैत्री हॉटेल’ येथे देशी दारूच्या तेरा बाटल्यांसह सापडला. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवा विस्कळीत
शिराढोक : कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरात सध्या बीएसएनएल सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेकवेळा रेंज गायब होत असल्याने नागरिकांचा संपर्क तुटत आहे. इंटरनेटची सेवाही वारंवार खंडित होत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
अवैध धंदे वाढले
तेर : तेरसह परिसरातील गावांमध्ये सध्या मटका, अवैध दारू विक्री यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. तरुण पिढी याच्या आहारी जात असून, यातून भांडण-तंटेदेखील वाढत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा व्यवसायांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
ज्वारी बहरली
(फोटो : अरूण देशमुख ३०)
भूम : तालुक्यात यंदा दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे जलसाठ्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. याचा फायदा रब्बी पिकांना होत असून, बहुतांश ठिकाणी रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा आदी पिकांची वाढ जोमदार झाल्याचे पाहायला मिळत आहे.
रांगोळी प्रदर्शन
(फोटो)
उस्मानाबाद : दत्त जयंतीनिमित्त येथील कलायोगी आर्टस्च्यावतीने रांगोळी प्रदर्शन आयाेजित करण्यात आले होते. यावेळी अभिषेक देवकर, ऋषिकेश झिरमीरे, दीपराज भोकरे, आकाश नेटके, ऐश्वर्या शेरकर, अभिलाषा पिंपळे, पल्लवी सावंत या विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या.