कळंबच्या आडत बाजारात वॉचमनचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:24 AM2021-06-06T04:24:42+5:302021-06-06T04:24:42+5:30

कळंब येथील मार्केट यार्ड भागात अजय साहेबराव जाधव यांचा आडत व्यवसाय आहे. आडत दुकानाच्या वरच्या मजल्यावर जाधव कुटुंब वास्तव्यास ...

Watchman's murder in Kalam's Adat Bazaar | कळंबच्या आडत बाजारात वॉचमनचा खून

कळंबच्या आडत बाजारात वॉचमनचा खून

googlenewsNext

कळंब येथील मार्केट यार्ड भागात अजय साहेबराव जाधव यांचा आडत व्यवसाय आहे. आडत दुकानाच्या वरच्या मजल्यावर जाधव कुटुंब वास्तव्यास आहे. जाधव यांच्या आडतीवर मागील वीस वर्षांपासून मच्छींद्र छगन माने (रा. फरिदनगर, डिकसळ भाग) हे दिवसा हमाली काम करून रात्री वॉचमनचे काम करतात. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे माने हे जाधव यांच्या आडतीवर नाईट ड्युटी बजावत होते. यादरम्यान, पहाटे दोननंतर अज्ञात व्यक्तींनी माने यांची निर्घृण हत्या केली. त्यांच्या छातीच्या बगलेवर गंभीर जखम दिसून येत आहे.

सकाळी जाधव यांचा पुतण्या व्यायामाकरिता घराबाहेर पडत असताना हा प्रकार समोर आला. यानंतर त्यांनी घटनेची तत्काळ पोलिसांना कल्पना दिली. घटनास्थळी कळंब पोलीस दाखल झाले. यानंतर पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना कळंब पोलिसांना दिल्या. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

सीसीटीव्ही फुटेज प्राप्त, गोळीबाराची चर्चा...

पोलिसांनी पंचनामा करून लागलीच तपासाला सुरुवात केली. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही व्यक्ती गेटवरून आत प्रवेश करताना, तसेच मयत मच्छींद्र माने यांच्याबरोबर झटापट करताना दिसून येत आहेत. यावरून हा प्रकार खुनाचाच असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, छातीजवळ असलेल्या गोलाकार जखमेमुळे हा प्रकार गोळीबाराचा असल्याची चर्चा सकाळी कळंबमध्ये होती. मात्र, हा खून गोळी झाडून झाला की, अन्य हत्याराचा यात वापर झाला, हेही निष्पन्न झाले नव्हते. मृतदेह अंबाजोगाई येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, अहवाल आल्यानंतरच खरा प्रकार समोर येऊ शकतो. दरम्यान, हा खून चोरीच्या उद्देशाने झाला की अन्य, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Watchman's murder in Kalam's Adat Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.