धरणात पाणी, मग गावात का नाही? महिलांनी काढला घागर माेर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 04:26 PM2023-12-02T16:26:00+5:302023-12-02T16:26:22+5:30
ईट ग्रामपंचायतीचा गलथान कारभार : पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळेना
ईट (जि. धाराशिव) : भूम तालुक्यातील सर्वांत माेठी ग्रामपंचायत म्हणून ईटची ओळख. या गावाला मांजरा नदीवरील संगमेश्वर प्रकल्पावरून पाणीपुरवठा हाेताे. या धरणात सध्या चांगला पाणीसाठा आहे. असे असतानाही गावकऱ्यांना मात्र पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही. हे सर्व ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे घडत असल्याचा आराेप करीत महिलांनी शनिवारी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर घागर माेर्चा काढला. कार्यालयात सरपंच नसल्याने महिलांनी रिकाम्या खुर्चीला हार घातला.
ईट ग्रामपंचायतीअंतर्गत पांढरेवाडी व झेंडेवाडी ही दाेन छाेटी गावेही येतात. पांढरेवाडी गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा याेजना आहे. तर ईट गावासाठी मांजरा नदीवरील संगमेश्वर प्रकल्पातून पाणीपुरवठा याेजना राबविण्यात आलेली आहे. प्रकल्पाच्या पायथ्याशी दाेन विहिरी खाेदण्यात आल्या आहेत. या विहिरींनाही मुबलक पाणी आहे. विजेचाही प्रश्न नाही. असे असतानाही ईटकरांना मात्र पंधरा-पंधरा दिवस पाण्यासाठी तरसावे लागत आहे.
ग्रामपंचायतीकडून पाणी याेजनेच्या देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेवर हाेत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना कृत्रिम टंचाईला सामाेरे जावे लागत आहे. दरम्यान, गावचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वेळाेवेळी झाली; परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी हाती रिकामी घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक माेर्चा काढला. हा माेर्चा कार्यालयात पाेहाेचला असता, सरपंचांची खुर्ची रिकामी हाेती. हे पाहून संतापलेल्या महिलांनी थेट रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली.
यानंतर निवेदन उपसरपंच देशपांडे यांनी स्वीकारले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अण्णासाहेब देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, संचालक प्रवीण देशमुख, युवासेना तालुका प्रमुख नीलेश चव्हाण, सुनील देशमुख, सयाजी हुंबे, वंचित आघाडीचे समाधान हाडोळे आदी उपस्थित हाेते.