माकणी प्रकल्पातून शेतीसाठी सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:37 AM2021-08-17T04:37:36+5:302021-08-17T04:37:36+5:30
उस्मानाबाद/लोहारा : पावसाने प्रदीर्घ खंड दिल्यामुळे खरिपाची पिके वाळून चालली आहेत. याअनुषंगाने माकणीच्या तेरणा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी ...
उस्मानाबाद/लोहारा : पावसाने प्रदीर्घ खंड दिल्यामुळे खरिपाची पिके वाळून चालली आहेत. याअनुषंगाने माकणीच्या तेरणा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात होती. यानंतर खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यास यश आले असून, रविवारी दोन्ही कालव्यांतून पाण्याच्या विसर्गास सुरुवात करण्यात आली. याचा लोहारा, उमरगा, औसा व निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
मागील एक महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यालगत असलेल्या शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मागच्याच आठवड्यात लातूर विभागाचे अधीक्षक अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करून पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी लातूरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा प्रकर्षाने मांडला. या अनुषंगाने पाणी सोडण्याचा निर्णय होऊन रविवारी प्रकल्पातून खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सध्या या प्रकल्पात एकूण ४९.५५८ दलघमी एवढा उपलब्ध पाणीसाठा आहे. यापैकी डाव्या व उजव्या दोन्ही कालव्याद्वारे प्रत्येकी ३.०४ घनमीटर प्रतिसेकंद इतका विसर्ग होत आहे. पुढील पंधरा दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे उजव्या कालव्यालगतच्या लोहारा-उमरगा तालुक्यातील माकणी, सास्तूर, राजेगाव, पेठसांगवी, होळी, कवठा यासह एकूण २३ गावांतील शेतकऱ्यांना व डाव्या कालव्यालगतच्या औसा तालुक्यातील सारणी, मंगरूळ आदी २० गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत आहे. यावेळी अधीक्षक अभियंता रोहित जगताप, शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख मोहन पणुरे, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, कास्तीचे सरपंच परवेज तांबोळी, मोघ्याचे सरपंच सचिन गोरे, पंडित ढोणे, बालपीर शेख आदी उपस्थित होते.