वाशी शहर पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:35 AM2021-05-08T04:35:06+5:302021-05-08T04:35:06+5:30
वाशी-शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात मुबलक पाणी आहे. असे असतानाही केवळ नगरपंचायतीतील पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत हाेत ...
वाशी-शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात मुबलक पाणी आहे. असे असतानाही केवळ नगरपंचायतीतील पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत हाेत आहे. काही भागांत दहा दिवसाआड तर काही भागांत दाेन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा हाेत आहे. याबाबत नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
वाशी शहरास भूम तालुक्यातील वंजारवाडी प्रकल्पातून १७ किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यात आले आहे. पाणीसाठा करण्यासाठी दाेन जलकुंभ उभारण्यात आले आहेत. मध्यंतरी जलवाहिनीवर ट्रक आडवा पडल्यामुळे चार ते पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला हाेता. त्यानंतर विजेच्या तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला. सर्व अडचणी दूर झाल्यानंतरही साखळी पद्धतीने पाणीपुरवठा सुरू करणे आवश्यक हाेते परंतु, तसे झाले नाही. परिणामी शहराच्या काही भागांत दहा दिवसाआड तर काही परिसरात दाेन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागांत गरजेपेक्षा जास्तवेळ पाणी साेडले जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय हाेत आहे. या सर्व प्रकाराला पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्याचा आराेप आता वाशीकरांतून हाेत आहे.
चाैकट...
पाणीपुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांची बैठक
पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने तक्रारी झाल्यानंतर मुख्याधिकारी गिरीश पंडित यांनी तातडीने अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक लावली. पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या अनुषंगाने सूचना करण्यात आल्या आहेत. यापुढेही चक्राकार पद्धतीनेच पाणीपुरवठा केला जाईल. एकाच भागात दाेन अथवा तीनवेळा पाणी साेडले जाणार नाही. तयार केलेल्या नियाेजनाची अंमलबजावणी हाेते की नाही, हे पाहण्यासाठी नगर पंचायतीच्या एका कर्मचार्याची नियुक्ती करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी पंडित यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.