चाळी नामशेष होण्याच्या मार्गावर, शहरातील भाडेकरूंची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 05:51 AM2018-03-11T05:51:12+5:302018-03-11T05:51:35+5:30
गावागावांचे मिळून शहर, शहराची कामगारनगरी त्यानंतर उद्योगनगरी- औद्योगिकनगरी म्हणून नावारूपास येताना पिंपरी-चिंचवड महानगर झाले. माहिती-तंत्रज्ञान (आयटी) पार्कमुळे या महानगरातील झगमगाट वाढला आणि आर्थिक चक्रे झपाट्याने फिरू लागली.
रहाटणी : गावागावांचे मिळून शहर, शहराची कामगारनगरी त्यानंतर उद्योगनगरी- औद्योगिकनगरी म्हणून नावारूपास येताना पिंपरी-चिंचवड महानगर झाले. माहिती-तंत्रज्ञान (आयटी) पार्कमुळे या
महानगरातील झगमगाट वाढला आणि आर्थिक चक्रे झपाट्याने फिरू लागली. येथे मोठ्या प्रमाणात चाळी उभ्या राहिल्या.
प्रशस्त घरे आणि बंगलेही आकारास आली; मात्र अर्थचक्रात ही संकल्पना मागे पडली आणि मोठमोठे गृहप्रकल्प शहरात उभारले गेले. परिणामी घर आणि चाळ संस्कृतीला ‘घर घर’ लागली. चाळी जमीनदोस्त झाल्याने सर्वसामान्यांना शहरात भाड्याने घर किंवा खोली मिळणेही दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ‘घर देता का कोणी घर’ असे म्हणण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.
पिंपरी- चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून ओळखली जाते. राज्यभरातून नव्हे, तर देशाच्या कानाकोपºयातून रोजगाराच्या उद्देशाने अनेक जण येथे स्थिरावण्यासाठी आसरा शोधू लागले. अनेक जण खोली किंवा घर भाडे स्वरूपात घेणे पसंत करतात. त्यासाठी या उपनगरातील अनेक स्थानिकांनी चाळी बांधून खोल्या भाडे स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला.
मात्र सध्या या चाळींच्या जागी बहुमजली इमारती उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे या उपनगरातील अनेक दशकांची चाळ संस्कृती बंद झाली आहे. कमी भाडे दराचे घर नागरिकांना मिळणे मुश्कील झाले आहे. या शहरात सर्वसामान्यांना घर घेणे परवडत नाही; तर भाड्याने घर मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या औद्योगिक नगरीच्या चाळ संस्कृतीत सध्या घरघर लागल्याचे दिसून येत आहे.
अतिश्रीमंत होण्याची स्पर्धा
चाळींऐवजी गृहप्रकल्प किंवा बहुउद्देशीय प्रकल्प उभारल्यास अल्पावधीत कोट्यवधी रुपये मिळविण्याचा प्रयत्न जागा किंवा चाळमालकांकडून सुरू आहे. अन्य जागा किंवा चाळमालक याच माध्यमातून अतिश्रीमंत झाल्याचे दिसते. त्यामुळे आपणही अल्पावधीत अतिश्रीमंत होऊन आलिशान वाहने, दागदागिने खरेदी करावेत, अशी ईर्षा असते. असे
चाळ किंवा जागामालक श्रीमंत असले, तरी अतिश्रीमंत होण्याची स्पर्धा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यासाठी चाळी पाडून गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत.
शहरालगतच्या गावांत वाढताहेत चाळी
शहरात रोजगाराच्या संधी आहेत. असे असले, तरी राहण्यास घर मिळत नाही. त्यामुळे अशा सामान्य कुटुंबीयांची परवड होत आहे. अनेक जणांना शहरालगत असलेल्या गावांमध्ये राहणे भाग पडत आहे. कामासाठी शहरात ये-जा करावी लागत आहे. परिणामी शहरालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चाळी तयार होत आहेत. शहरातील चाळी कमी होत आहेत.
भाडेतत्त्वावर घर किंवा खोली देताना भाडेकरार करून त्याची पोलीस ठाण्याला नोंद करणे बंधनकारक आहे. त्यामुळे घरमालक मेटाकुटीला आले आहेत. अनेकांनी चाळी पाडण्याचा सपाटा लावला आहे. चाळमालकांनी भाडे वाढविण्याचा सपाटा लावला आहे. सध्या शाळांना सुटी लागणार असल्याने अनेक कुटुंबे मूळ गावी जाण्याच्या बेतात आहेत. याच कालावधीत घरे भाड्याने मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनेक जण गल्लोगल्ली फिरून भाड्याने घर किंवा खोली उपलब्ध होईल का, याबाबत चौकशी करीत आहेत. ‘घर देता का कोणी घर’, असे म्हणत शहरभर हिंडण्याची वेळ या सर्वसामान्यांवर आली आहे.