'आम्ही ताटकळत उभे असतो, बस थांबतच नाही'; एसटीसाठी विद्यार्थ्यांचा रस्त्यावरच ठिय्या
By चेतनकुमार धनुरे | Published: August 9, 2023 12:29 PM2023-08-09T12:29:18+5:302023-08-09T12:29:58+5:30
दोन तासांच्या ठिय्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर अभ्यास करुन केले आंदोलन
तामलवाडी (जि.धाराशिव) : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेस थांबत नसल्याने उघड्यावरच अनेक तास वाट पाहत थांबावे लागते. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी रस्त्यावरच ठिय्या मांडून दोन तास अभ्यास करीत आंदोलन केले.
तामलवाडी येथील शाळेत लगतच्या माळुंब्रा, पांगरदरवाडी, सांगवी (काटी), सुरतगाव येथील सुमारे दोनशे विद्यार्थी गावातून ये-जा करीत असतात. मात्र, अनेक बसेस या मार्गावर थांबत नाहीत. चालक-वाहकांचे विद्यार्थ्यांशी वर्तन असभ्य असते. निवारा पुरेसा नसल्याने उन्ह-पावसात बराच वेळ या विद्यार्थ्यांची हेळसांड होते. यासंदर्भात मुख्याध्यापक सुहास वडणे यांनी वर्षभरापासून एसटीच्या अधिकाऱ्यांना लेखी पत्र व्यवहार केला आहे.
तरीही बदल होत नसल्याने अखेर बुधवारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून दोन तास अभ्यास केला. तातडीने सुधारणा नाही झाल्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक तामलवाडी येथील टोलनाक्यावर आंदोलन छेडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच सायंकाळी चार ते पाच या वेळेत तुळजापूर डेपोच्या दोन बसेस विद्यार्थ्यांसाठी सोडाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.