येत्या चार दिवसांत अंतिम भूमिका ठरवू, तोपर्यंत संयम पाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:36 AM2021-05-25T04:36:45+5:302021-05-25T04:36:45+5:30
सोमवारी रात्री खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी येथील मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक, कार्यकर्ते, शहरातील डॉक्टर, विधीज्ञ व मराठा बांधव ...
सोमवारी रात्री खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी येथील मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक, कार्यकर्ते, शहरातील डॉक्टर, विधीज्ञ व मराठा बांधव यांच्याशी सुमारे पाऊण तास चर्चा केली. यावेळी उपस्थित डॉ. जहागीरदार, डॉ. सुजित मगर, डॉ. अक्षय पाटील, ॲड. तानाजी जगताप, ॲड.अमोल गुंड, ॲड.जयवंत इंगळे, प्रा. विवेक गंगणे, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक अभिजीत पाटील, समन्वयक महेश गवळी यांनी आपली मते मांडली. सर्वांचे म्हणणे ऐकून घेत खा. संभाजीराजे यांनी हे सर्व मुद्दे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडले जातील, अशी ग्वाही दिली. मराठा आरक्षणा व्यतिरिक्त राज्य सरकारकडून मराठा समाजाला कोणते आर्थिक लाभ मिळविता येतील, याबद्दल आपण राज्य सरकारशी चर्चा करू, यापुढे मराठा मोर्चे काढण्यापेक्षा विधीज्ञाची फळी उभी करून सर्वोच्च न्यायालयातून मराठा आरक्षण मिळवू, कायदा माणसासाठी आहे माणूस कायद्यासाठी नाही, यामुळे घटना दुरुस्ती करण्यास आपण समाज बांधव भाग पाडू. तोपर्यंत सर्वांनी संयम पाळावा. येत्या चार दिवसात राज्य सरकारशी यासंदर्भात चर्चा करून मराठा आरक्षण संदर्भात पुढील ठोस भूमिका घेतली जाईल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. स्वागत धीरज पाटील यांनी केले. प्रास्ताविक समन्वयक सज्जनराव साळुंके यांनी केले, तर आभार धैर्यशील कापसे यांनी मानले. यावेळी नगरसेवक राहुल खपले, शहरातील मराठा समाजाचे विधिज्ञ, डॉक्टर, प्राध्यापक व मराठा क्रांती ठोक मोर्चाचे सर्व समन्वयक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कॅप्शन : तुळजापूर येथे सोमवारी रात्री मराठा समाजबांधवांशी संवाद साधताना खा. छत्रपती संभाजीराजे. (फोटो : 24obd40)