‘तुमचा संताेष देशमुख करू '; माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना धमकीचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:07 IST2024-12-24T15:06:35+5:302024-12-24T15:07:45+5:30
या प्रकरणी ढाेकी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल, चिठ्ठी देणाऱ्यांच्या मागावर पाेलिस

‘तुमचा संताेष देशमुख करू '; माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना धमकीचे पत्र
ढाेकी (जि. धाराशिव) : राज्याचे माजी आराेग्यमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत यांच्या दाेन्ही पुतण्यांना ठार मारण्याच्या धमकीची चिठ्ठी आली आहे. ‘तुमचा संताेष देशमुख मस्साजाेग केला जाईल’ असा मजकूर त्या चिठ्ठीमध्ये आहे. या प्रकरणी ढाेकी पाेलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या अज्ञाताविरुद्ध साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भैरवनाथ शुगर्स संचलित तेरणा साखर कारखान्याचा ट्रॅक्टर ऊस घेऊन तेरकडून ढाेकी येथे येत हाेता. हा ट्रॅक्टर मुळेवाडी पाटीवर आला असता, दुचाकीवर आलेल्या व चेहरा झाकलेल्या दाेघांनी ट्रॅक्टर राेखला. यानंतर चालकाजवळ एक बंद पाकीट दिले. ‘हे पाकीट तेरणा कारखान्याच्या गेटवर सुरक्षा रक्षकाकडे दे’ असे म्हणत दाेघेही सुसाट निघून गेले. हा ट्रॅक्टर ढाेकी कारखान्याच्या गेटवर पाेहाेचला असता, चालकाने संबंधित पाकीट सुरक्षा रक्षक संजय निपाणीकर यांच्याकडे दिले. त्यांनी पाकीट उघडून पाहिले असता, आतमध्ये १०० रुपयांची एक नाेट व चिठ्ठी निघाली. ‘धनंजय सावंत व केशव सावंत यांचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल’, असा मजकूर त्या चिठ्ठीत हाेता. यानंतर कारखान्याचे शेतकी अधिकारी मच्छिंद्र पुंड यांनी रात्री ११ वाजता ढाेकी ठाण्यात धाव घेऊन संबंधित चिठ्ठी ढोकी पोलिसांकडे दिली.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पाेलिसांच्या पथकाने रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ‘स्पाॅट’वर जात (बंद पाकीट दिलेले ठिकाण) पहाणी केली. यानंतर संजय निपाणीकर यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, तर केशव सावंत हे तेरणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत.