१५० किलो वजन, ८ फुट लांब; शेतातील विहिरीत महाकाय मगर आढळल्याने खळबळ
By बाबुराव चव्हाण | Published: September 28, 2024 11:29 AM2024-09-28T11:29:13+5:302024-09-28T11:30:23+5:30
फवारणीसाठी शेतात गेले अन् विहिरीत आढळली मगर; वडगाव लाख शिवारात खळबळ
- अजित चंदनशिवे
तुळजापूर : तालुक्यातील वडगाव लाख येथील मारुती मंदिर ट्रस्टच्या शेतजमिनितील ३५ फूट विहिरीत गुरुवारी आढळून आलेली जवळपास १५० किलो वजनाची ८ फुटी मगर शनिवारी पहाटे पकडण्यात वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला यश आले. यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला.
तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथील शेतकरी महादेव शिंदे हे गुरुवारी दुपारी फवारणीसाठी पाणी आणण्याकरिता मारुती मंदिर ट्रस्टच्या शेतजमिनीतील विहिरीवर गेले होते. अंदाजे ३५ फूट खोल असणाऱ्या या विहिरीत मगर आढळून आली. ही वार्ता पसरताच खळबळ उडाली होती. दरम्यान, माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थाच्या मदतीने विहिरीतील पाणी काढण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, पाणी काढण्यासाठीची सामुग्री उपलब्ध न झाल्याने सायंकाळ झाली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ग्रामस्थानी चार विद्युत मोटारी व एक जनरेटरची सुविधा उपलब्ध करून वहिरीतील पाणी बाहेर काढले.
शनिवारी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास मगर विहिरीच्या बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले. यासाठी वन अधिकारी बी. ए. पोळ, सहाय्यक वनसंरक्षक व्ही. बी. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी राहूल शिंदे व वन्यजीव रक्षक सेवाभावी संस्था उदगीर यांच्या पथकाने परिश्रम घेतले. दरम्यान, वन विभागाने संबंधित मगर नैसर्गिक अधीवासात सोडली आहे.