मोबाइल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:26+5:302021-06-09T04:40:26+5:30
उस्मानाबाद : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी, मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता निर्बंध शिथिल ...
उस्मानाबाद : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी, मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता निर्बंध शिथिल झाल्यामुळे नागरिक मोबाइल दुरुस्तीसाठी दुकानांमध्ये गर्दी करीत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडालेला पहावयास मिळत आहे.
राज्य सरकारने ४ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे सर्वजण घरीच होते. घरात राहिल्यामुळे वेळ घालविण्यासाठी आबालवृध्दांसह सर्वांचा मोबाइल हाच एकमेव आधार होता. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन क्लासेस, नेट, बँकिंग यासोबतच कोरोना रुग्णांची चौकशी करण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग आदींसाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यासोबतच लसीकरण नोंदणीसाठी सर्वच जण मोबाइलचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. लॉकडाऊन कालावधीत मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सततच्या वापराने व अन्य कारणांमुळे मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड आला आहे; परंतु, लॉकडाऊनमुळे सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. याव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद होती. त्यासोबतच ऑनलाइनने मोबाइलचे सुटे पार्ट मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे अनेकांचे मोबाइल बंद आहेत. आता जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले. दुकाने दुपरी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आढले आहेत. त्यामुळे मोबाइलच्या दुकानात गर्दी दिसून येत आहे.
दीड महिना बाजारपेठ बंद
कोरोनामुळे पहिल्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आले. लाट ओसरत असताना लॉकडाऊन हटविल्यानंतर काही प्रमाणात स्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र, पुन्हा दुसरी लाट आल्याने सर्व बंद करण्यात आले. त्यामुळे दोन महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे मोबाइल दुरुस्ती करता आली नाही. परिणामी अनेकांचे मोबाइल बंद पडले.
घर चालविणे झाले कठीण
मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये व यंदाही आम्हाला आमचे मोबाइल दुकान बंद ठेवावे लागले. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडाला. घर चालविणे कठीण झाले. मोबाइलधारकांच्याही समस्या वाढल्या. परंतु, आमचे दुकानच बंद असल्याने हातात कवडी नाही, असे मोबाइल दुरुस्ती करणाऱ्यांनी सांगितले.
मोबाइल महत्त्वाचा; पण आरोग्य
आजघडीला मोबाइल हा आपला अविभाज्य घटक झाला आहे. परंतु, सततच्या वापरामुळे मोबाइलमध्ये बिघाड झाला आहे. आता सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत मोबाइल दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे मोबाइल दुरुस्तीसाठी मी दुकानात जाईल.
सिध्दार्थ शिंदे, मोबाईलधारक
मोबाइल दुरुस्त करण्यासाठी आलो होतो. मोबाइल दुरुस्तीविना घरातच पडून होता. आता प्रत्येक गोष्टीसाठी मोबाइल लागतो. पाेरांनाही मोबाइल पाहिजे. आता निर्बंध काहीअंशी शिथील झाले आहेत. त्यामुळे मोबाइल दुरुस्त करून घेणार आहे. मात्र घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत आहे.
अन्सार शेख, मोबाईलधारक
दीड महिन्यांनतर शटर उघडले
गरिबांपासून तर श्रीमंतांपर्यंत सर्वांचीच मोबाइल आज गरज बनली आहे. त्यामुळे अनेक जण मोबाइल दुरुस्तीसाठी किंवा नवीन मोबाइल खरेदीसाठी दुकानात येत आहेत. संचारबंदीत दुकाने बंदच होती. त्यामुळे आमचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
सय्यद जहिरोद्दीन, मोबाइल व्यावसायिक
प्रतिदिन ३० हजार रुपयांची उलाढाल होत होती. दीड महिन्यापासून मोबाइल दुकाने बंद होती. दुकाने बंद असली तरी दुकान भाडे व लाइट बिल घरी बसून भरावे लागले. तसेच बँकांचे हप्ते सुरू आहे. आता दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे काहीअंशी दिलासा मिळाला आहे. नागरिकांना मास्क तसेच सॅनिटायझर अनिवार्य केले आहे.
विजय डोके, मोबाइल व्यावसायिक
काय कारण
सततच्या वापरामुळे मोबाइलमध्ये बिघाड झाला. मोबाइल स्क्रीन गार्ड खराब झाले.
फोन आल्यास आपल्याला आवाज येत नाही किंवा फोन केल्यास आवाज येत नाही.
चार्जिंग केल्यानंतर बॅटरी लवकर उतरत आहे.
चार्जिंग सॉकेट खराब झाले.
मोबाइल पडल्याने डिस्प्ले खराब झाला.
मोबाइल टच स्क्रीन खराब झाला.