दाखल्यांवर शेरा काय असणार? मुख्याध्यापकांसह विद्यार्थी-पालक संभ्रमात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:19 AM2021-07-24T04:19:53+5:302021-07-24T04:19:53+5:30
तालुक्यातील माध्यमिक शाळा - ६२ दहावीतील विद्यार्थी- ३८२८ पास विद्यार्थी - ३८२७ पास झालेली मुले - १९१४ पास झालेल्या ...
तालुक्यातील माध्यमिक शाळा - ६२
दहावीतील विद्यार्थी- ३८२८
पास विद्यार्थी - ३८२७
पास झालेली मुले - १९१४
पास झालेल्या मुली - १९१३
गटशिक्षणाधिकारी कोट-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत परीक्षेच्या बदललेल्या अभूतपूर्व निकालामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. दाखल्यावर तारीख कुठली आणि शेरा काय द्यायचा याबाबत कुठल्याच सूचना नसल्याने याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन घेऊन मुख्याध्यापकांना कळविण्यात येईल.
- शिवकुमार बिराजदार, गटशिक्षणाधिकारी, उमरगा
मुख्याध्यापक म्हणतात...
दहावीचा १६ जुलै रोजी ऑनलाईन निकाल लागलेला आहे. अद्याप सर्व विद्यार्थ्यांचे मार्क मेमो शाळेला उपलब्ध होणे बाकी आहेत. परंतु दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट शाळेकडे असल्याने, जर एखाद्या पालकाने शाळा सोडल्याचा दाखला मागणी केला, तर विद्यार्थ्याचा ओरिजनल मार्क मेमो आमच्या हातात प्राप्त झाल्यानंतर आम्ही पालकांना विद्यार्थ्याचा दाखला देऊ शकतो. परंतु सीईटी २१ ऑगस्टला होणार असल्याने कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश सीईटीचा निकाल लागल्यानंतरच होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागेल. शेरा लिहिण्यास किंवा तारीख लिहिण्यास अडचण येणार नाही.
- पद्माकर मोरे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद हायस्कूल, उमरगा.
दहावीची परीक्षाच यावर्षी झाली नसल्याने विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शेरा काय द्यावा, असा प्रश्न मुख्याध्यापक म्हणून आमच्यापुढे होता. पण विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गुणपत्रिकेत नमूद केल्याप्रमाणे शालांत प्रमाणपत्र परीक्षा एप्रिल २०२१ मध्ये एल-०००००१ या क्रमांकावरून उत्तीर्ण असा शेरा असावा. यामुळे संभ्रमाचा प्रश्न निर्माण होणार नाही.
- शाहूराज जाधव, मुख्याध्यापक, भारत विद्यालय, उमरगा.
पालक म्हणतात...
निकाल लागला. परंतु, गुणपत्रक कधी मिळणार याबाबत काही माहिती नाही. मुले सध्या अकरावीच्या ऑनलाईन अभ्यासात गुंतलेली आहेत. अशातच अकरावीचे प्रवेश हे सीईटीवर आधारित आहेत. आता पुन्हा मुलांना दहावीचा अभ्यास करावा लागतोय. सर्वत्र गोंधळाची परिस्थिती दिसून येते. शैक्षणिक वर्ष कधी सुरू होईल, याबाबत काहीच कळायला मार्ग नाही.
- वनराज सूर्यवंशी, पालक, उमरगा
निकाल लागून पाच-सहा दिवस निघून गेले. शाळेत वर्गशिक्षकांना चौकशी केली असता, गुणपत्रिका बद्दल व शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत त्यांनाही काही निश्चित माहिती नव्हती. मुख्याध्यापकांची भेट घेतली तेव्हा त्यांनी असे सांगितले की, प्रत्येक वर्षी आम्ही हातात गुणपत्रक आल्यानंतर गुणपत्रकाचा नंबर दाखल्यावर टाकतो. तसेच तो कधी पास झाला, तो महिना व वर्ष टाकतो. मात्र यंदा दाखल्यावर महिना व वर्ष कोणते टाकावे, याबद्दल अजून लिखित स्वरूपात काहीच मिळाले नाही, असे सांगितले.
- उदय बिराजदार, पालक, शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा