स्कूलबसचे चाक थांबले, जगायचे कसे? चालकांपुढे जीवन-मरणाचा गंभीर प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:35 AM2021-05-20T04:35:04+5:302021-05-20T04:35:04+5:30
जिल्ह्यात सुमारे १५० स्कूलबस धावतात. त्यावर काम करणारे सुमारे १०० चालक एका फटक्यात बेरोजगार झाले आहेत. बस एकाच जागी ...
जिल्ह्यात सुमारे १५० स्कूलबस धावतात. त्यावर काम करणारे सुमारे १०० चालक एका फटक्यात बेरोजगार झाले आहेत. बस एकाच जागी थांबून आहेत. सुरुवातीचे काही महिने मालकांनी अर्धा पगार देऊन चालकांच्या उदनिर्वाहाची व्यवस्था केली; पण लाॅकडाऊन लांबतच गेल्याने हा मार्गही थांबला. बस मालकांना बॅंकेचे हप्ते, आरटीओचे कर आदी खर्च वाढल्याने चालकांचे वेतन थांबले.
कोरोना काळात रुग्णवाहिकांची चलती असल्याने अनेकांनी त्यावर चालक म्हणून काम स्वीकारले. उस्मानाबादेत ३० च्यावर स्कूलबस चालक रुग्णवाहिकांवर काम करताहेत त्यातून त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अनेक स्कूलबस चालकांनी मालवाहतूक टेम्पो चालविण्याचे काम स्वीकारले आहे. तर अनेक जण बांधकाम मजूर म्हणून काम करत आहेत.
आर्थिक घडी विस्कटली
स्कूल बसवर चालक म्हणून काम करत होतो. त्यातून महिन्याला १३ हजार रुपये पगार मिळायचा. शाळा बंद असल्याने स्कूलबस बंद आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या मालवाहतूक टेम्पोवर चालक म्हणून काम करत असून महिन्याकाठी ८ हजार रुपये मिळत आहेत.
प्रवीण कांबळे
बांधकाम मजूर म्हणून काम
मागील १४ महिन्यापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूलबस घरासमोर उभ्या कराव्या लागत आहेत. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी सध्या बांधकाम मजूर म्हणून काम करत आहे. तेही रोज मिळत नाही. त्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
दादासाहेब गवळी
शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा
स्कूल बस चालवून महिन्याकाठी २० हजार रुपये मिळत होते. त्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालत मात्र स्कूलबस बंद झाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शेतात मजूर म्हणून काम करत आहे. शासनाने स्कूलबस चालकांना मदत केली पाहिजे.
गोपाळ शिंदे
स्कूल बस बंद झाल्याने ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन शिकविण्याचे काम करीत होतो. या कामातून महिन्याला १५ हजार रुपये मिळत होते. स्कूलबस बंद झाल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन शिकविण्याचे काम सुरु केले. मात्र, ते काम मागील दोन महिन्यापासून बंद आहे. काम नसल्याने घरी बसावे लागले आहे.
नवनाथ बारकुल,
माझ्या स्वत:च्या दोन स्कूलबस आहेत. या बसच्या माध्यमातून वाहनचालकांच्या पगारी करुन १६ हजार रुपये हाती पडत होते. सव्वा वर्षापासून दोन्ही गाड्या घरासमोर उभ्या आहेत. मात्र, शासनाने आमची दखल घेतलेली नाही. कुटूंबाचा गाडा हाकण्यासाठी आता हमालीची काम करीत आहे. मात्र तेही मिळेना झाले आहे.
डिगंबर वाघमारे,
शासनाने दखल घ्यावी
शासनाने रिक्षा चालकांची दखल घेऊन परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. त्याच धर्तीवर स्कूलबसचालकांना मदत देण्यात यावी,शासनाच्या विविध विभागातील वाहनांवर कोरोना काळात तात्पुरती भरती सुरु आहे. त्यामध्ये स्कूलबस चालकांना संधी द्यावी.
अनेक स्कूलबस चालक चांगल्या शैक्षणिक पात्रतेेचे आहेत. त्यांना शिक्षणानुसार कंत्राटी भरती मध्ये प्राधान्य देण्यात यावे.