'काय लेका आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही'; हतबल शेतकऱ्याने संवपले जीवन
By बाबुराव चव्हाण | Updated: October 27, 2023 20:16 IST2023-10-27T20:16:29+5:302023-10-27T20:16:43+5:30
मयत शेतकऱ्याच्या नातेवाइकांनी मराठा आरक्षणासाठी ही आत्महत्या झाल्याचा दावा केला आहे

'काय लेका आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही'; हतबल शेतकऱ्याने संवपले जीवन
परंडा (जि. धाराशिव) : काय लेका आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, अशी हतबलता पुतण्यासमोर व्यक्त करून बाहेर पडलेल्या डत्तेमगाव येथील मराठा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.
परंडा तालुक्यातील डोमगाव येथील शेतकरी बळीराम देविदास साबळे (४७) हे शुक्रवारी सकाळी आपल्या पुतण्याशी बोलत होते. त्यांनी मराठा आरक्षणावर बोलताना, काय लेका आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळेना, त्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी, असे वक्तव्य करुन साडेदहा वाजण्याच्या सुमारास घर सोडल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे.
दुपारी उशीर झाला तरी ते घरी परतले नाहीत म्हणून त्यांच्या पत्नी हिराबाई साबळे या शेतात गेल्या असता बळीराम साबळे यांनी एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती कळताच गावातील बापू मिस्कीन व अन्य काही नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. त्यांनी पोलिस व महसूल प्रशासनालाही या घटनेची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची कोणतीही नोंद परंडा पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. मात्र, मयत शेतकऱ्याच्या नातेवाइकांनी मराठा आरक्षणासाठी ही आत्महत्या झाल्याचा दावा करण्यात येत होता.