फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली, गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:39 AM2021-09-04T04:39:09+5:302021-09-04T04:39:09+5:30
उस्मानाबाद : शहरासह ग्रामीण भागामध्ये सिलिंडचा वापर वाढला आहे. मात्र, सिलिंडरचे दर मागील दीड वर्षापासून दिवसागणिक वाढू लागले आहेत. ...
उस्मानाबाद : शहरासह ग्रामीण भागामध्ये सिलिंडचा वापर वाढला आहे. मात्र, सिलिंडरचे दर मागील दीड वर्षापासून दिवसागणिक वाढू लागले आहेत. गतमहिन्यात २५ रुपयाने दर वाढ झाली असतानाच पुन्हा सप्टेंबर महिन्यातही सिलिंडर २५ रुपयाने महागला आहे. दर वाढत असल्याने ग्रामीण भागातील महिला चुलीकडे वळल्या आहेत. आता शहरी भागातही चुलीवर स्वयंपाक करायचा का? असा संतप्त सवाल गृहिणीमधून व्यक्त केला जात आहे.
मागील दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने घातलेल्या थैमानामुळे सर्वसामान्य आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या काळात पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाचे दरातही वाढ होत आहे. त्या पाठोपाठ गॅस सिलिंडरच्या किंमतीही सातत्याने वाढत आहेत. वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलिंडच्या वाढत्या किंमतीमुळे ग्रामीण भागातील महिला चुलीवर स्वयंपाक करण्यास पसंती देत आहेत. शहरी भागातही काही ठिकाणी महिला आता चुलीवर स्वयंपाक करताना आढळून येत आहेत.
दर महिन्याला नवा उच्चांक
दिनांक दरवाढ सिलिंडरचे दर
१ डिसेंबर ५० ७१०
१ जानेवारी ०० ७१०
१ फेब्रुवारी २५ ७३५
१ मार्च १०० ८३५
१ एप्रिल -१० ८२५
१ मे ०० ८२५
१ जून ०० ८२५
१ जुलै २६ ८५१
१ ऑगस्ट २५ ८७६
१ सप्टेंबर २५ ९०१
सबसिडी किती भेटते
मागील दीड दोन वर्षापूर्वी सिलिंडरचे दर ६०० रुपयांच्या जवळपास होते. तसेच त्यावर सबसिडीही १०० ते १५० रुपये मिळत. त्यामुळे ग्रामीण भागातील कुटूंबांनाही सिलिंडर परवडत होता.
मागील काही महिन्यांपासून सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक महिलांनी चुलीवर स्वंयपाक करण्यास पसंती दिली आहे.
सप्टेंबर महिन्यात सिलिंडरचे दर ९०० रुपयांच्या पुढे सरकले आहेत. मात्र, त्या तुलनेत सबसिडी कमी आहे. जानेवारी महिन्यापासून सबसीडी ५ ते १० रुपये मिळत आहे.
व्यावसायिक सिलिंडरही महाग
घरगुती सिलिंडरच्या किंमती वाढत असताना व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही महिने व्यवसाय बंद होते. आता हॉटेल व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच महागाई वाढली आहे. गेल्या महिन्यात १६८० रुपयांना मिळणारे सिलिंडर या महिन्यात सिलिंडरचा दर एवढा झाला आहे.
महिन्याचे गणित कोलमडले
या वर्षात गॅस सिलिंडरच्या दरात सतत वाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यात २५ रुपये तर सप्टेंबर महिन्यात २५ रुपयाने सिलिंडरच गॅस महागला आहे. कोरोना काळात वाढत्या दरामुळे महिन्याचे गणित कोलमडत आहे. शासनाने सिलिंडर दराच्या किंमतीवर नियंत्रण ठेवावे.
अनुजा कदम, गृहिणी
दीड वर्षापासून पेट्रोल, डिझेल खाद्य तेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यासोबतच सिलिंडरचे दरातही वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात ७१० रुपयांना मिळणारे सिलिंडर आता ९०१ रुपयांना मिळत आहे. सिलिंडरचे दर वाढत राहिले तर चुलीवर स्वयंपाक करावा लागणार आहे.
कोमल गायकवाड, गृहिणी