चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात घातला विळा, पतीला १० वर्षांची सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:57 IST2025-01-24T13:56:53+5:302025-01-24T13:57:03+5:30
चारित्र्यावर संशय घेऊन केला होता जिवघेणा हल्ला

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात घातला विळा, पतीला १० वर्षांची सक्तमजुरी
धाराशिव : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात चेहऱ्यावर विळ्याने वार करीत जिवे मारण्याचा प्रयत्न कोंड येथील एकाने १ सप्टेंबर २०२१ रोजी केला होता. याप्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण होऊन गुरुवारी आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्या. आर.एस. गुप्ता यांनी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी ठोठावली आहे.
धाराशिव तालुक्यातील कोंड येथील आरोपी नरसिंग गोरोबा चव्हाण हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमीच मारहाण करीत होता. १ सप्टेंबर २०२१ रोजी शेतात मूग-उडीद काढत असतानाही दोघांत यावरुन वाद झाला. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आरोपीने पत्नीच्या डोक्यात आधी काठीने वार केला. पाठोपाठ विळ्याने डोक्यात, चेहऱ्यावर वार करुन हातही फ्रॅक्चर केला. या घटनेत गंभीर झालेल्या महिलेवर लातूर येथे उपचार करण्यात आले.
दरम्यान, त्यांचा मुलगा सचिन चव्हाण याने ३ सप्टेंबरला ढोकी ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नरसिंग चव्हाणवर नोंद केला. पुढे सहायक निरीक्षक सुरेश बनसोडे व जगदीश राऊत यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणी समोर आलेले साक्षी-पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन गुरुवारी न्या. आर.एस. गुप्ता यांनी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
५५ हजारांचा दंडही ठोठावला...
आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी सुनावतानाच न्या. गुप्ता यांनी कलम ३०७ अंतर्गत ५० हजार रुपये व कलम ५०४, ५०६ अन्वये प्रत्येकी अडीच हजार, असा एकूण ५५ हजारांचा द्रव्यदंडही ठोठावला आहे.