पत्नीची गोळी झाडून हत्या करून आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या सहायक पाेलिस निरीक्षकास जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 11:53 AM2023-05-10T11:53:33+5:302023-05-10T12:03:56+5:30
राज्यभर गाजलेल्या प्रकरणात सासू अन् सासऱ्याची निर्दाेष मुक्तता करण्यात आली आहे
धाराशिव : कळंब तालुक्यातील येरमाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विनाेद चव्हाण यांना पत्नीच्या खून प्रकरणात जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी दाेषी ठरवीत जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खुनाची ही घटना २५ जानेवारी २०१८ राेजी घडली हाेती.
अतिरिक्त सरकारी अभियाेक्ता रश्मी चंद्रशेखर नरवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येरमाळा ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विनाेद चव्हाण यांची पत्नी माेनाली चव्हाण यांच्या छातीत गाेळी लागली हाेती. गंभीर अवस्थेत त्यांना २५ जानेवारी २०१८ राेजी उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात नेण्यात येत हाेते. मात्र, रस्त्यात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, विवाहाला तीन वर्षे हाेऊनही मूलबाळ हाेत नसल्याने आलेल्या नैराश्यातून माेनाली यांनी पतीच्या सर्व्हिस रिव्हाॅल्व्हरमधून गाेळी झाडून आत्महत्या केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मयत माेनाली यांचे वडील शशांक जालिंदर पवार (रा. चाैसाळा, जि. बीड) यांनी येरमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. माझी मुलगी माेनाली हिने आत्महत्या केली नसून तिचा चारित्र्यावरील संशयावरून तसेच हुंड्यातील राहिलेल्या पाच लाख रुपयांसाठी खून केल्याचे फिर्यादीत म्हटले. यानंतर पती विनाेद चव्हाण, सासू विमल चव्हाण व सासरा बापू चव्हाण या तिघांविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ४९८ (अ) व ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला हाेता. उपविभागीय अधिकारी डाॅ. नितीन कटेकर यांनी या खून प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमाेर हे प्रकरण चालले असता, समाेर आलेल्या साक्ष, पुरावे आणि अतिरिक्त सरकारी अभियाेक्ता रश्मी नरवाडकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून पती विनाेद चव्हाण यांना जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सासू व सासरा या दाेघांची सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता करण्यात आली.
अटक केल्यापासून आराेपी कारागृहातच...
माेनाली चव्हाण यांच्या खून प्रकरणात पती विनाेद चव्हाण हे अटक झाल्यापासून कारागृहातच हाेते. आराेपीस न्यायालयीन काेठडीत ठेवून (अंडर ट्रायल) हे प्रकरण न्यायालयासमाेर चालविण्यात आले. संबंधित हत्याकांड तेव्हा राज्यभर गाजले हाेते.