‘लोकमंगल’कडील थकीत ऊस बिलासाठी करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:04+5:302021-07-01T04:23:04+5:30
लोहारा : कारखान्याला ऊस पाठवून आठ महिने झाले तरी अद्याप लोकमंगल साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. अगोदरच कोरोनाने ...
लोहारा : कारखान्याला ऊस पाठवून आठ महिने झाले तरी अद्याप लोकमंगल साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. अगोदरच कोरोनाने मेटाकुटीस आलेला शेतकरी पेरणीसाठी हक्काचे पैसेही मिळत नसल्याने हवालदिल झाला आहे. त्यामुळे कारखान्याने तात्काळ पैसे द्यावेत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, घराघरात कोरोनाचे रुग्ण निघत असताना शेतकऱ्यांना खाजगी सावकारांचे उंबरठे झिझवावे लागले; परंतु पोटाला चिमटा देऊन कष्टाने पिकवलेल्या उसाचे पैसे मिळाले नाहीत. आता पेरणीसाठी उधारीवर बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने ऊस बिल देण्याबाबत कारखान्यास आदेश द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, शहराध्यक्ष आयुब शेख, तौफिक कमाल, ताहेर पठाण, सरफराज इनामदार, अमित कांबळे आदी उपस्थित होते.