सत्ता परिवर्तनाशिवाय स्वस्थ बसणार नाही; शरद पवार म्हणतात, मी अजून म्हातारा झालो नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 12:47 PM2024-11-11T12:47:42+5:302024-11-11T12:49:37+5:30
आता विधानसभेलाही चांगली माणसे निवडून आली पाहिजेत. आम्हाला सत्ता सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हवी आहे.
परंडा (जि. धाराशिव) : देशात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही इंडियाच्या झेंड्याखाली एकत्र आलो आहोत. त्यामुळे बाबासाहेबांचे संविधान आपण सर्व जण वाचवू शकलो. अगदी तसेच महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. मी काही अजून म्हातारा झालो नाही, परिवर्तन घडवून आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही खा. शरद पवार यांनी रविवारी परंडा येथील सभेतून दिली.
परंडा मतदारसंघात यावेळी हाय व्होल्टेज लढत होत आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याविरूद्ध शरद पवार गटाने पुन्हा एकदा माजी आ. राहुल मोटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासाठी रविवारी स्वत: खा. शरद पवार परंड्याच्या मैदानात उतरले. येथील आठवडी बाजाराच्या मैदानावर झालेल्या सभेत खा. पवार म्हणाले, आपल्या राज्यात पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा केवळ १, तर आमचे ४ खासदार होते. यंदाच्या निवडणुकीत तुम्ही -आम्ही एकत्र आलो. तुम्ही आमचे ३१ खासदार निवडून दिले. आता विधानसभेलाही चांगली माणसे निवडून आली पाहिजेत. आम्हाला सत्ता सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हवी आहे. जे सध्या होताना दिसत नाही. मी संरक्षणमंत्री असताना पहिल्यांदा लष्करात महिलांना संधी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळवून दिले. आता महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महालक्ष्मी योजनेतून ३ हजार रुपये दरमहा देणार आहोत. केंद्रात कृषिमंत्री असताना ऐतिहासिक अशी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती. आताही सत्तेत येताच शेतकरी कर्जमुक्त करणार आहोत. सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा आर्थिक मदत देऊन स्वावलंबी करणार आहोत. औषधी मोफत देण्याचा आमचा प्रयत्न असेल, त्यासाठी आपल्या सर्वांची साथ आवश्यक असल्याचेही खा. पवार म्हणाले.
‘विकास, बिकास काय नाय...’
अजित पवार व छगन भुजबळ यांनी अलीकडेच केलेल्या विधानांचा संदर्भ देत खा. पवार म्हणाले, पक्ष फोडून गेलेले आमचे लोक सुरुवातीला विकासासाठी गेलो म्हणत होते. आता स्वत:च सांगू लागले आहेत की, चौकशा मागे लागल्या होत्या म्हणून जावे लागले. त्यामुळे विकास, बिकास काय नाय. लोकांच्या लक्षात आले, तुम्ही का गेलात ते.