वाऱ्यामुळे आंब्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:33 AM2021-05-18T04:33:33+5:302021-05-18T04:33:33+5:30
शहरासह तालुक्यात सर्रास शेतकरी खरीप व रबी हंगामात एकच उत्पन्न घेतात. यामुळे उत्पन्न समाधानकारक मिळत असले तरी यातून आर्थिक ...
शहरासह तालुक्यात सर्रास शेतकरी खरीप व रबी हंगामात एकच उत्पन्न घेतात. यामुळे उत्पन्न समाधानकारक मिळत असले तरी यातून आर्थिक मिळकत मात्र पेरणी, काढणी व मळणीपर्यंत होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत अत्यल्प आहे. यामुळे शहरातील काही शेतकरी कमी खर्चात ठोक उत्पन्न मिळावे यासाठी केशर आंबा लागवडीकडे वळले आहेत. सध्या सर्वत्र आंबा लगडला असून, यातून उत्पन्नदेखील चांगले मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. परंतु, मागील चार-पाच दिवसांपासून शहरात सोसाट्याचे वारे वाहू लागल्याने व ढगाळ वातावरणामुळे काढणीला आलेला केशर आंबा खाली पडू लागला आहे. हा आंबा खाली पडत असल्याने यास डाग लागत आहे. तसेच हा आंबा खाली पडल्याने पिकवण्यायोग्य राहत नसल्याने पुन्हा शेतकऱ्याच्या पदरी निराशा येत आहे. शहरातील केशर आंबा उत्पादक उमेश वीर, अजित वीर यांनीही केशर आंब्याची बाग लावली असून, येथील आंबे विक्रीला आले आहेत. परंतु, वारे वाहू लागल्याने आंबे खाली पडू लागले आहेत. यामुळे उत्पन्न होण्याऐवजी नुकसान जास्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.