तुळजापुरातील इच्छापूर्ती गणेश मंदिरातील दानपेटी फोडण्याची चोरांची ‘इच्छा’ अयशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 06:42 PM2018-09-24T18:42:15+5:302018-09-24T18:46:11+5:30
तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील इच्छापूर्ती गणपती मंदिरात पहाटे चोरीची घटना घडली
तुळजापूर ( उस्मानाबाद) : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील इच्छापूर्ती गणपती मंदिरात आज पहाटे चोरीची घटना घडली. यात चोरट्यांना चांदीचे ताट लंपास करण्यात यश मिळाले तरी दोनपेटी फोडण्याची त्यांची ‘इच्छा’ मात्र फळली नाही़
तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील उस्मानाबाद मार्गावर इच्छापूर्ती गणपतीचे मंदिर आहे़ सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या शटरचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला़ सुरुवातीला मंदिरात ठेवलेली दानपेटी बाहेर आणून फोडण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्यात चोरट्यांना यश मिळाले नाही़ त्यामुळे दैनंदिन पुजेसाठी मूर्तीसमोर ठेवलेले ४५०० रूपये किंमतीचे चांदीचे ताट घेऊन चोरट्यांनी पोबारा केला़ सोमवारी सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर तुळजापूर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.
या प्रकरणी कल्याण तुकाराम तोडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, रविवारी रात्री श्रींच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या़ उश्रिापर्यंत चालेल्या मिरवणुकांनंतर शहर सामसूम होताच चोरट्यांनी गणपतीच्याच मंदिरात हात साफ केला़ दरम्यान, गुन्हा दाखल करुन पोलिसांनी विविध मार्गांनी तपास सुरू केला आहे़ परिसरातील नागरिकांकडे चौकशी करतानाच आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज खंगाळण्याचे कामही पोलिसांनी सुरु केले आहे़