चार महिन्यापासून मानधन नाही, कंत्राटी कर्मचारी बसले उपोषणास
By सूरज पाचपिंडे | Published: August 9, 2023 05:30 PM2023-08-09T17:30:07+5:302023-08-09T17:30:41+5:30
ग्राऊंड लेव्हलला कामे करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागात कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
धाराशिव : मृदा व जलसंधारण विभागातील कंत्राटी कामगारांना मागील चार महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याने कंत्राटी कर्मचारी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक ०.२ याेजनेअंतर्गत प्रकल्प स्तरावर मजूंर प्रकल्पाचे काम करण्यासाठी जिल्हा पाणलोट कक्षाअंतर्गत कामे विविध कामे राबविली जातात. ग्राऊंड लेव्हलला कामे करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागात कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
मात्र, १ एप्रिल २०२३ पासून ते अद्यापर्यंत नियुक्त पत्र न देता केवळ तोंडी आदेश देऊन कामे करुन घेतली जात आहे. शिवाय, चार महिन्याचे मानधनही देण्यात आले नाही. त्यामुळे उपोषणास बसावे लागल्याचे उपोषणकर्ते म्हणाले. प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२३ पासूनचे नियुक्ती पत्र देऊन त्वरीत चार महिन्याचे मानधन देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी उपोषणकर्त्यांनी केली. आंदोलनात विजय कांबळे, बाळू सोलनकर, बालाजी जकाते, सतिश बोंदर, पांडुरंग सोनार, मुकेश जाधव, रामेश्वर पवार, निशीकांत गिरी, कल्याण पठाडे, शरद सरवदे आदी सहभागी झाले आहेत.