वाळू वाहतुकीला अभय देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला उपजिल्हाधिकारी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 07:27 PM2021-07-28T19:27:26+5:302021-07-28T19:29:08+5:30
पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये कोतवाल याच्याकडे देताना त्यास लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले.
उस्मानाबाद / भूम : उपजिल्हाधिकारी मनीषा राशीनकर यांना २० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. वाळू वाहतुकीला अभय देण्यासाठी १ लाख १० हजारांची लाच मागितली होती. ९० हजारांत तडजोड झाली आणि कोतवालाकरवी ही रक्कम स्वीकारताना राशीनकर जाळ्यात अडकल्या. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार वाळूची वाहतूक करतो. ती सुरळीत चालू देण्यासाठी उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर (वय ४५) यांनी कोतवाल विलास जानकरच्याकरवी तक्रारदाराकडे १ लाख १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ९० हजार रुपये ठरले; मात्र तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्यापूर्वी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी या तक्रारीची खात्री केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी रात्री भूम येथे सापळा रचण्यात आला.
पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये कोतवाल विलास जानकर (वय ३२) याच्याकडे देताना त्यास लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी भूम ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. दरम्यान, पुढील कार्यवाही बुधवारी सकाळी होईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी रात्री उशिरा सांगितले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.