नायगावात दारूबंदीसाठी महिला आक्रमक; ग्रामपंचायतीला टाळे ठोकत बेमुदत उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 06:11 PM2024-02-12T18:11:23+5:302024-02-12T18:11:41+5:30
या आंदोलनामुळे शिराढोण परिसरातील अवैध धंद्याचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.
कळंब (धाराशिव ): पोलीस प्रशासनाला वारंवार सूचना, लेखी निवेदन देऊनही कळंब तालुक्यातील नायगाव येथे अनधिकृत दारू विक् तसेच इतर अवैध व्यवसाय सुरूच आहेत. यामुळे संतापलेल्या गावातील महिलांनी आक्रमक होत ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकत बेमुदत उपोषण सुरू केले. या आंदोलनामुळे शिराढोण परिसरातील अवैध धंद्याचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.
अवैध दारू विक्रीमुळे गावातील अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत. याचा त्रास महिला, शाळकरी मुला -मुलींना सहन करावा लागत आहे. यामुळे गावातील तरुण आणि महिलांनी गावातील बेकायदेशीर दारूचे अड्डे उध्वस्त करा, अवैध धंदे बंद करा अशी मागणी धाराशिवच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यावर कार्यवाही न झाल्याने दारूबंदीसाठी महिलांनी आज सकाळी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने हे टाळे काही काळानंतर काढण्यात आले. त्यानंतर महिलांनी गावातच बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने पाठिंबा दिला आहे. गावातून दारू कायमस्वरूपी हद्दपार होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला.