महिलांनी गटारीच्या पाण्याची पूजा करून केली पालिकेविरोधात गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 05:30 PM2017-11-10T17:30:54+5:302017-11-10T17:36:21+5:30
पालिकेतील सत्ताधारी व विरोधकांच्या कुरघोडीच्या राजकारणात शहराच्या विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. या प्रकाराबाबत नागरिकांतून तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.
उमरगा (जि. उस्मानाबाद) : पालिकेतील सत्ताधारी व विरोधकांच्या कुरघोडीच्या राजकारणात शहराच्या विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. या प्रकाराबाबत नागरिकांतून तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग ७ मधील महिलांनी नालीची पूजा करून गांधीगिरी करत पालिकेच्या कारभाराची लक्तरे काढली.
उमरगा शहरातील प्रभाग ७ मधील शासकीय दूध डेअरी पाठीमागे व डिग्गी रोडलगत असलेल्या भू-विकास बँक कॉलनी भागात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते, लाईट व गटारीचा प्रश्न बिकट झाला आहे. याबाबत या भागातील नागरिकांनी पालिकेला व प्रभागाच्या नगरसेवकास निवेदन देऊन व वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले, असा आरोप येथील रहिवाशांतून होत आहे. विशेष म्हणजे या प्रभागाचे नगरसेवक संजय पवार हे पालिकेतील गटनेते आहेत.
दरम्यान, वारंवार पाठपुरावा करूनही पालिका प्रशासनासह पदाधिकारी दखल घेत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर वैतागलेल्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत आज परिसरात जागोजागी साचलेल्या गटारीच्या घाण पाण्याचे पूजन करत गांधीगिरी केली. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सुनंदा माने, सचिव मीरा चव्हाण, उपाध्यक्षा श्रीदेवी बिराजदार, संगटक सुनीता सुगावे, महिला बचत गटाच्या कविता पाटील, संगीता पाटील, सुधामती कवठे, राजश्री महाजन, विजया तपसाळे, कविता जाधव, शशिकला पाटील, जगदेवी पाटील, सुनीता तांबोळी, दीपिका झपरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
तर तीव्र आंदोलन करू
असुविधांबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु, त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही. प्रशासनासह पदाधिका-यांचे लक्ष वेधण्यासाठीच शुक्रवारी गांधीगिरी करण्यात आली आहे. यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.