दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा लोहारा तहसीलमध्ये ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 05:25 PM2018-12-28T17:25:21+5:302018-12-28T17:31:31+5:30
गावातील अवैध दारूविक्री कायम बंद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लोहारा ( उस्मानाबाद) : तालुक्यातील नागूर येथे सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करावी, या मागणीसाठी महिलांनी शुक्रवारी लोहारा येथील तहसील व पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून मागण्यांचे निवेदन दिले़ अधिकाऱ्यांना धारेवर धरत गावातील अवैध दारूविक्री कायम बंद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लोहारा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर साडेचार हजार लोकसंख्येचे नागूर हे गाव आहे़ या गावात गत अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री होत आहे़ अवैध दारू विक्रीची तीन दुकाने असून, अनधिकृत थाटलेल्या दुकानातून देशी, विदेशी दारूची खुलेआम विक्री केली जात आहे. गावात दारू सहज उपलब्ध होत असल्याने युवा पिढी दारूच्या आहारी जात आहे. दारुमुळे अनेकांचे संसार उध्दवस्त होत असून, तळीरामांमुळे महिला, मुलींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ शिवाय भांडण- तंट्यामुळे गावाची शांतताही बिघडत आहे़ त्यामुळे गावातील अवैध दारु विक्री बंद करावी, अशी मागणी ऑगस्ट महिन्यात प्रशासनाकडे ग्रामस्थ, महिलांनी केली होती़ त्यानंतर पोलिसानी काही कारवाया करून दहा, वीस दारुच्या बाटल्या जप्त केल्या़ मात्र, कारवाईनंतरही पुन्हा दारू विक्री जोमाने सुरू राहते़ केव्हातरी होणारी कारवाई आणि खुलेआम सुरू असलेली दारूविक्री यामुळे संतप्त झालेल्या महिला, नागरिकांनी शुक्रवारी लोहारा येथील तहसील व पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून मागण्यांचे निवेदन दिले.
अवैध दारूविक्रेत्यांशी असलेल्या ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे सातत्याने कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला़ यावेळी इंदुबाई जावळे, राधा मोरे, अंजली पाटील, पद्मिनी पाटील, मनिषा जावळे, सुनंदा मोरे, गजराबाई कांबळे, रुपा सोनवणे, सुनंदा पवार, त्रिशला पाटील, रेखा मोरे, मैनाबाई जाधव, पार्वती शेवाळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़
तर तीव्र आंदोलन करू
गावात दारूबंदीचा ठराव ग्रामपंचायतने घेतला असून, पोलीस अधिक्षक, उत्पादन शुल्क विभागाला निवेदनाद्वारे माहिती देऊन दारूबंदीची मागणी केली होती़ मात्र, दारूविक्री सुरू असल्याने आजचे आंदोलन करावे लागले़ यापुढे गावात दारूविक्री सुरू राहिली तर तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा सरपंच गणेश जावळे यांनी दिला़