आंदाेरा-बारातेवाडी रस्त्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:39 AM2021-09-07T04:39:08+5:302021-09-07T04:39:08+5:30
कळंब - एकीकडे मंजुरी मिळत नसल्याने गावोगावच्या रस्त्याची दुरवस्था झाली असताना दुसरीकडे मात्र चक्क चालू काम मागच्या अनेक महिन्यांपासून ...
कळंब - एकीकडे मंजुरी मिळत नसल्याने गावोगावच्या रस्त्याची दुरवस्था झाली असताना दुसरीकडे मात्र चक्क चालू काम मागच्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत बंद ठेवण्यात आल्याने आंदोरा येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत ग्रामीण भागातील इतर जिल्हा, ग्रामीण मार्ग दर्जाचे रस्ते येतात. विशेषतः दोन गावांना परस्परांशी जोडणारे, पंचक्रोशीतील मोठ्या गावांना इतर गावांशी संलग्न करणाऱ्या रस्त्यांचा यात समावेश होतो. ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या समजल्या जाणाऱ्या या रस्त्यांच्या देखभालीसाठी कायम निधीची वानवा असते. यामुळे गावोगावी दुरवस्था झालेल्या रस्त्यांची संख्या मोठी आहे. यातच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याच्या सुधारणेसाठी मोठा निधी मंजूर होऊ लागला. तालुक्यातील आंदोरा, बाभळगाव ते बारातेवाडी या १३.६२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी २०१८ मध्ये उपरोक्त योजनेतून कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. यानंतर याची निविदा प्रक्रिया पूर्ण होत उस्मानाबाद येथील एका कंत्राटदाराने याचा ठेका घेऊन कामाला मुहूर्तही लावला. मात्र, मागच्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे आंदोरा शिवारातील काम अर्धवट अवस्थेत बंद आहे. दगड, माती, खड्डे, खडी अशा अवस्थेत ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे याचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी धनंजय तामाने, बालाजी तामाने, अशोक तामाने, हरिभाऊ कवडे, संजय मोरे, अनंतराव लांडगे, प्रकाश तांबारे, नरसिंग शिंदे आदींनी प्रशासनाकडे केली आहे.
चौकट...
मुदत संपून फक्त दोन वर्षे झाली...
आंदोरा, बाभळगाव ते बारातेवाडी या रस्ता कामाचा कोट्यवधी रुपयांचा ठेका घेतलेल्या कंपनीने १२ जुलै २०१८ रोजी सुरू केलेले काम १२ जुलै २०१९ रोजी असे बारा महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक होते. यास दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही.
जनता त्रस्त, तरी ठेकेदारांचे लाड...
ग्राम सडकच्या रस्ता कामाची गुणवत्ता, कामाची मुदत याचे अनेक किस्से आहेत. आंदोऱ्याचे रखडलेले काम हे यापैकीच एक उदाहरण. यामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना ग्रामविकास विभाग, रस्ते विकास संस्था व कार्यकारी अभियंता कार्यालय एजन्सीचे लाड कशामुळे पुरवीत आहे असा संतप्त सवाल केला जात आहे.