काम तर नाही मिळाले जीव गेला; फुटपाथवर बसलेल्या कामगाराला कंटेनरने चिरडले
By बाबुराव चव्हाण | Updated: March 8, 2024 18:36 IST2024-03-08T18:36:40+5:302024-03-08T18:36:59+5:30
नळदुर्ग बसस्थानकासमाेरची घटना, कंटेनरने कामगाराला चिरडून जवळपास वीस फूट दूर फरफटत

काम तर नाही मिळाले जीव गेला; फुटपाथवर बसलेल्या कामगाराला कंटेनरने चिरडले
नळदुर्ग -फूटपाथवर बसलेल्या कामगाराला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येथील बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर घडली.
लोहारा तालुक्यातील भोसगा येथील किशोर सिद्राम गायकवाड (५०) हे गवंडी कामावर मजूर म्हणून काम शोधण्यासाठी नळदुर्ग येथे आले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता ते बसस्थानकाच्या समोरील फुटपाथवर बसले हाेते. याचवेळी हैदराबादहून सोलापूरकडे जाणारा भरधाव कंटेनर (क्र. टीएस. १५- यूए.०७७६) फूटपाथवर चढला व किशोर गायकवाड यास चिरडून जवळपास वीस फूट दूर फरफटत घेऊन गेला. यात किशोर गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी कंटेनर ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली.