कळंब-लातूर राज्यमार्गाचे काम रेंगाळले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:10 AM2021-09-02T05:10:47+5:302021-09-02T05:10:47+5:30
कळंब - गो स्लो म्हणजे सावकाश जा, असे फलक कळंब-लातूर या राज्यमार्गावर जागोजाग लावले गेले आहेत, पण बांधकाम विभागाने ...
कळंब - गो स्लो म्हणजे सावकाश जा, असे फलक कळंब-लातूर या राज्यमार्गावर जागोजाग लावले गेले आहेत, पण बांधकाम विभागाने हायब्रीड अन्युटी योजनेंतर्गत केलेल्या कामाची गती काही फास्ट होत नसल्याने वाहनधारकांत नाराजी आहे. मागील २-३ वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे कळंब-लातूर ही तब्बल ७० किमीची वाट बिकट झाली आहे. या कामासाठी काही लोकप्रतिनिधींनी केलेली शिष्टाईही कामी आली नसल्याने यंत्रणाचे कान कोण टोचणार, हाही प्रश्न आहे.
कळंब लातूर हा राज्यमार्ग कळंब व लातूर या दोन व्यापारी शहराला जोडणारा राज्यमार्ग आहे. या मार्गावरील शिराढोण, रांजणी ही मोठी गावेही मोठी लोकवस्ती असलेली आहेत. याच भागात सर्वात जास्त ऊस उत्पादन होते. मांजरा धरणाला समांतर असलेला हा राज्यमार्ग ग्रीन बेल्ट मार्ग म्हणूनही ओळखला जातो. रांजणी येथील साखर कारखान्यासह लातूर जिल्ह्यातील विकास व मांजरा या कारखान्यालाही हा भाग ऊसपुरवठा करतो. त्यामुळे साहजिकच या मार्गावर मोठी वाहतूक आहे. हीच बाब लक्षात घेऊन महायुती शासनाच्या काळात या रस्त्याचे काम हायब्रीड अन्युटी योजनेखाली हाती घेतले होते. त्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीस चांगला होईल, अशी या मार्गावरील गावातील नागरिकांची, तसेच वाहनधारकांची अपेक्षा होती. हे काम चालू होऊन आता दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. या रस्त्याचे एका बाजूचे काम बहुतांश ठिकाणी करून ठेवले आहे. दुसरी बाजू खोदून तर काही ठिकाणी खडी अंथरून ठेवली आहे. काही ठिकाणी रस्ता नुसताच उकरून ठेवला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वन वे वाहतूक झाली आहे, तर काही भागांत मातीच असल्याने पावसाळ्यात वाहने फसत आहेत व घसरतही आहेत. एकूणच रस्ता असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे.
चौकट -
आता नवा गडी, नवा राज!
रस्त्याचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराने कामासंदर्भातील नियम व अटी न पाळल्याने आता या कामाची जबाबदारी दुसऱ्या कंत्राटदारावर टाकली आहे. रस्त्याच्या कामासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी त्याला आठ दहा दिवस लागतील. त्यानंतर, ते काम चालू होईल. जुन्या कंत्राटदाराला कामाच्या विलंबाबद्दल जवळपास साडेपाच कोटींचा दंड आकारला आहे. नवीन कंत्राटदाराला लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याची माहिती लातूर बांधकाम विभागाचे उपअभियंता रोहन जाधव यांनी दिली. विशेष म्हणजे, या रस्त्याची लांबी कळंब तालुक्यातून जास्त प्रमाणात जात असताना हे काम लातूर बांधकाम विभागामार्फत केले जात आहे.
चौकट -
उस्मानाबाद जिल्ह्यातील नेत्यांची शिष्टाई फेल -
काही दिवसांपूर्वी पावसाने रस्त्याचे हाल झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांकडे धाव घेऊन रस्त्याचे काम चालू करण्याबाबत पुढाकार घेण्याची मागणी केली. यावर काहींनी लातूरच्या अधिकाऱ्यांना फोनाफोनी केली, तर काहींनी थेट संवाद साधला. काहींनी निवेदन दिले. त्यावर सोशल मीडियावर त्या नेत्यांचे आभारही मानण्यात आले, पण लातूरच्या अधिकाऱ्यांनी या नेत्यांचे म्हणणे फक्त ऐकून घेतले व सोडून दिले, असेच चित्र या कामांची अवस्था पाहून दिसत आहे.
चौकट -
कळंब ढोकी बेंबळीसारखा दर्जा नको!-
कळंब-ढोकी-बेंबळी हा राज्यमार्गही हायब्रीड अन्युटी योजनेत केला आहे. मात्र, या रस्त्याचा दर्जा व्यवस्थित नसल्याची ओरड आहे. काही ठिकाणी जुनेच पूल कायम ठेवले आहेत. रस्त्याची रुंदीही वादग्रस्त ठरत आहे. सर्व्हिस रोडही करण्यात आले नाहीत, अशा बऱ्याच बाबी आता या रस्त्याबाबत बाहेर येत आहेत. त्यामुळे कळंब लातूर राज्यमार्ग दर्जेदार व्हावा, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.