रोजंदारीतील कपातीमुळे कामगार महिला रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:58+5:302021-07-11T04:22:58+5:30
(फोटो : बालाजी बिराजदार १०) लोहारा : शहरात महिला सफाई कामगारांच्या रोजंदारीत कपात केल्याने महिलांनी शनिवारी काम बंद करत ...
(फोटो : बालाजी बिराजदार १०)
लोहारा : शहरात महिला सफाई कामगारांच्या रोजंदारीत कपात केल्याने महिलांनी शनिवारी काम बंद करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन केले. याप्रसंगी रोजंदारीत वाढ करण्याचे अश्वासन गुत्तेदारांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
लोहारा शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. त्यानंतर गेले तीन वर्षांपासून शहरातील साफसफाई करणे, कचरा व्यवस्थापन करण्याचे कंत्राट लातूर येथील जनआधार सेवाभावी संस्थेला मिळाले. त्यानंतर शहरातील साफ सफाई करणे, कचरा गोळा करण्याचे काम सुरू झाले. यासाठी संस्थेने २५ महिला ३० पुरुष यासाठी रोजंदारीवर नेमले आहेत. त्यात संस्थेला मिळणाऱ्या पैशातून शासनाने पन्नास टक्के रक्कम कपात केली. त्यामुळे जनआधार सेवाभावी संस्थेने कामगार कपात करण्याऐवजी कामगाराच्या कामाचे तास कमी करत रोजंदारीतही कपात केली. त्यामुळे पूर्वीप्रमाणे रोजंदारी देण्यात यावी, या मागणीसाठी सफाई कामगार महिलांनी शनिवारी सकाळी सहापासून काम बंद करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले.
याप्रसंगी जन आधार सेवाभावी संस्थेचे दिलीप चव्हाण शहरात दाखल झाले. यावेळी चव्हाण व काही माजी नगरसेवकांत तसेच महिलांत रोजंदारीवरून वाद निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूर्वीप्रमाणे रोजंदारी मिळाली पाहिजे, यावर यावर महिला ठाम होत्या. त्यानंतर महिलांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला. काही माजी नगरसेवक व नागरिकांनी मध्यस्थी करत जनआधार सेवाभावी संस्थेचे दिलीप चव्हाण व महिलांत चर्चा झाली. यात कामाचे तास हे चारच राहतील व रोजंदारी केलेली कपात मागे घेत रोजंदारी वाढविण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.