चिंताजनक ! उस्मानाबादेत बाप-लेकास ओमायक्रॉनचा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 05:52 PM2021-12-15T17:52:05+5:302021-12-15T17:53:49+5:30
काही दिवसांपूर्वीच या व्यवसायातूनच त्याने विदेशवारी करुन शारजाह शहरात वास्तव्य केले होते.
उस्मानाबाद : विदेशवारी करुन नुकतेच गाव गाठलेल्या एका ४२ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्याच्यासह त्याच्या कुटूंबातील पाच सदस्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला असून, या व्यक्तीसह त्याच्या दहावीतील मुलास ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील एक ४२ वर्षीय व्यक्ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय करते. काही दिवसांपूर्वीच या व्यवसायातूनच त्याने विदेशवारी करुन शारजाह शहरात वास्तव्य केले होते. तेथून परतल्यानंतर विमानतळावर त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात निगेटीव्ह अहवाल आला होता. मात्र, नियमानुसार गावी परतल्यानंतर पुन्हा त्याची आरोग्य विभागाने चाचणी केली. त्यात कोविड पॉझिटीव्ह आढळून आला. पुढे त्याच्या संपर्कातील इतर दोन व्यक्तीही कोविडबाधित निघाल्या.
दरम्यान, आरोग्य विभागाने विदेशवारी करुन आलेल्या ४२ वर्षीय व्यक्तीसह त्याच्या कुटूंबातील ५ जणांचे सॅम्पल पुण्याच्या नॅशनल व्हायरालॉजी इन्स्टिट्युटला तपासणीसाठी पाठविले होते. तेथून बुधवारी अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये ४२ वर्षीय व्यक्तीसह त्याच्या दहावीतील मुलास ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.