तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाचा होणार एक्स-रे; भिंतीला तडे गेल्याचे आढळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:53 IST2025-02-13T08:53:22+5:302025-02-13T08:53:41+5:30
मंदिराच्या स्थायित्वाचा आणि मजबुतीकरणाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आले आहे

तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाचा होणार एक्स-रे; भिंतीला तडे गेल्याचे आढळले
धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या मंदिराला पुरातन रूप प्राप्त करून देण्यासाठी सध्या पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली कामे सुरू आहेत. यात अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेल्याचे आढळून आले आहे. या अनुषंगाने अगदी भिंतीच्या आतीलही तड्यांचा शोध घेण्यासाठी एक्स-रे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी पुरातत्त्वच्या सहायक संचालक जया वाहने यांनी दिली.
मंदिराच्या स्थायित्वाचा आणि मजबुतीकरणाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आले आहे. त्यात मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील आणि सभामंडपातील दगडी बीम, स्तंभ व कर्णशिळांमध्ये तडे आढळून आले आहेत. या अनुषंगाने बोरस्कोपी चाचणीतून मंदिरात वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या बांधकाम साहित्याची तपासणी करण्यात येणार आहे.
भूकंपानंतर बळकटीकरण
मंदिराच्या शिखराचे बळकटीकरण १९९३ साली झालेल्या भूकंपानंतर करण्यात आले होते. मात्र, त्या दुरुस्तीमुळे शिखरावर अतिरिक्त भार येऊन मूळ दगडी रचनेस तडे गेल्याचा निष्कर्ष पुरातत्त्व विभागाने केलेल्या पाहणीतून काढण्यात आला आहे.