कोरोना प्रादुर्भावामुळे भगवती देवीची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:25 AM2021-01-10T04:25:00+5:302021-01-10T04:25:00+5:30
माडज : उमरगा तालुक्यातील नाईचाकूर (भगत वाडी) येथील भगवती देवीची १३ जानेवारी रोजी होणारी यात्रा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात ...
माडज : उमरगा तालुक्यातील नाईचाकूर (भगत वाडी) येथील भगवती देवीची १३ जानेवारी रोजी होणारी यात्रा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सिमेवर उंच डोंगरावर हे जगदंबा देवीचे मंदिर असून, प्रत्येक वर्षी वेळामावस्यानंतर दुसऱ्या दिवशी ही यात्रा भरते. या यात्रेत विविवध व्यावसायिकांसोबतच हळदी-कुंकवाचे व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात. शिवाय, हे गाव सीमेवर असल्यामुळे कर्नाटकातील व महाराष्ट्रातील भाविक भक्त आपल्या घरातील माळ, परडी घेऊन जोगवा मागण्यासाठी भगवती देवीच्या यात्रेला आवर्जुन उपस्थित राहतात. परंतु, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्या अनुषंगाने हा यात्रौत्सव रद्द करण्यात आला आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात्रेच्या दिवशी पारंपरिक विधी व भगवती देवीच्या डोंगराला घालण्यात येणाऱ्या छबिना हा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने परिसरात पाळणे, मिठाईचे दुकान हॉटेल केळीचे व्यापारी, हळदी कुंकवाचे व्यापारी, स्टेशनरी नारळ आणि इतर छोटे-मोठे व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात. त्यांनीही यंदा येऊ नये, असे आवाहनही सचिव बालाजी पवार यांनी केले आहे.