नळाला पिवळसर पाणी; एआयएमआयएम आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:12 AM2021-02-05T08:12:17+5:302021-02-05T08:12:17+5:30
कळंब : सध्या शहरामध्ये नळाला पिवळसर पाणी येत असल्याचा आरोप करीत एआयएमआयएमच्या शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन कर्मचाऱ्यांना ...
कळंब : सध्या शहरामध्ये नळाला पिवळसर पाणी येत असल्याचा आरोप करीत एआयएमआयएमच्या शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन कर्मचाऱ्यांना जाब विचारला.
मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नळाला पिवळसर पाणी येत आहे. ते कशामुळे येत आहे व हा प्रकार मागील काही दिवसांपासून चालू असतानाही जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचारी दुर्लक्ष का करीत आहेत, याचा जाब विचारण्यासाठी एमआयएमचे तालुकाध्यक्ष वाजिद काझी, युवा अध्यक्ष मुजम्मिल मुजावर, मोहसीन शेख यांनी थेट जलशुद्धीकरण केंद्र गाठले.
राज्य सरकार प्रत्येक नागरिकांना मुबलक व स्वच्छ पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असताना शहरात पिवळ्या रंगाचे पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. याचे नेमके कारण काय, पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित नाही का, अशी प्रश्नांची सरबत्ती यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांवर करण्यात आली. आगामी काळात असेच अशुद्ध पाणी आल्यास नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
कॅप्शन - कळंब शहरात नळाद्वारे पिवळ्या रंगाचे पाणी येत असल्याचा जाब विचारताना एमआयएमचे वाजिद काझी, मुजम्मिल मुजावर, मोहसीन शेख आदी.