येणेगूर-सुपतगाव रस्ता खाेदला, वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:23 AM2020-12-27T04:23:35+5:302020-12-27T04:23:35+5:30
येणेगूरहून सुपतगावकडे जाणारा डांबरी रस्ता एका शेतकऱ्याने रात्रीतून खोदल्याने त्याच ठिकाणी माेठा खड्डा पडला आहे. वास्तविक पाहता राज्य ...
येणेगूरहून सुपतगावकडे जाणारा डांबरी रस्ता एका शेतकऱ्याने रात्रीतून खोदल्याने त्याच ठिकाणी माेठा खड्डा पडला आहे. वास्तविक पाहता राज्य मार्गावर जलवाहिनीसाठी पाईप टाकताना संबंधित खात्याची रितसर परवानगी घेणे बंधनकारक असते. परंतु, येणेगूर येथील लेंडकी नाल्याच्यानजीक सुपतगाव रस्त्यावर असलेल्या सिमेंट बंधाऱ्यातील पाण्याचा उपसा करण्यासाठी हा रस्ता रात्रीच्या वेळेस जेसीबीच्या सहाय्याने खोदल्याने त्या ठिकाणी खड्डा व उंचवटा निर्माण झाला आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावरून शेतकरी शेती कामासाठी नेहमी ये-जा करीत असतात. शिवाय बैलगाडी व जनावरांचीही वर्दळ असते. अचानक खोदलेल्या रस्त्यामुळे जनावरांसह शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित खात्याने डागडुजी करून वाहतुकीस सुलभ रस्ता करून देण्याची मागणी श्रीकांत पोफळे, शंकर कस्तुरे, मोहद्दीन पांढरे, सुलतान खरोसे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
काेट...
जिल्हा परिषदेचे बांधकाम कनिष्ठ अभियंता राजू चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्या शेतकऱ्याने परवानगी न घेतल्याचे सांगितले. तसेच हा रस्ता पूर्ववत करू देऊ, अशी ग्वाही दिली.