योग्य व्यवस्थापनातून घेतले हेक्टरी ६५ क्विंटल उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:21 AM2021-06-27T04:21:24+5:302021-06-27T04:21:24+5:30
पाथरूड : पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने नियोजनबद्ध शेती केल्यास थोड्याबहुत पाण्यातही ऊस पिकाइतके पैसे ज्वारीसारख्या अवघ्या ...
पाथरूड : पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने नियोजनबद्ध शेती केल्यास थोड्याबहुत पाण्यातही ऊस पिकाइतके पैसे ज्वारीसारख्या अवघ्या चार महिन्यांच्या पिकातून मिळू शकतात, हेच भूम तालुक्यातील आनंदवाडी येथील शेतकरी नीलेश खामकर यांनी दाखवून दिले आहे. ठिंबक सिंचनाचा वापर करून त्यांनी एकरी २६ क्विंटल म्हणजेच हेक्टरी ६५.५० क्विंटल उत्पादन रब्बी हंगामातील ज्वारी पिकातून घेतलेले असून, त्यामुळे कृषी विभागाच्या पीक स्पर्धेतही त्यांची जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे.
भूम तालुका ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय केला जात असल्याने लाखोंच्या संख्येने पशुधन आहे. या पशुंना वर्षभर लागणारा वाळला चारा हा ज्वारी पिकातूनच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो. त्यामुळे पूर्वी वैरणीसाठी प्राधान्याने ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. परंतु, अलीकडील काही वर्षांत या पिकातून योग्य मेहनत व व्यवस्थापनातून भरघोस ज्वारीचे उत्पादनही शेतकरी घेऊ लागले असून, उसासारख्या मोठ्या प्रमाणात पाणी लागणाऱ्या व वर्षभर सांभाळ कराव्या लागणाऱ्या पिकाइतके पैसे अवघ्या चार महिन्यांच्या ज्वारी पिकातूनदेखील मिळू शकतात, हेच येथील शेतकरी दाखवून देत आहेत.
आनंदवाडी येथील नीलेश यादव खामकर हे दरवर्षी उपलब्ध क्षेत्रापैकी काही क्षेत्रावर ठिंबक सिंचनाचा वापर करीत ज्वारीचे पीक घेतात. याहीवर्षीही त्यांनी एक एकर क्षेत्रावर ट्रॅक्टरच्या साह्याने १८ इंचांवर ‘सफेद गंगा’ या वाणाच्या ज्वारीची पेरणी केली. पेरणी करतेवेळेस ५० किलो डीएपी खतमात्रा दिली व त्यानंतर अर्धा ते एक फुटापर्यंत ज्वारीची वाढ होताच दोन ओळीतील अंतर ४ फुट ठेवून ठिंबक टाकले. यानंतर गरजेनुसार पाणी दिले. ठिंबक सिंचन पद्धतीमुळे सर्व ज्वारीच्या रोपांना सारखेच पाणी मिळाल्याने व कायम वाफसा स्थिती राहिल्याने पिकाची समान वाढ होऊन उत्पादनात भरघोस वाढ होण्यास मदत झाली. यामुळे एका एकरात २६ क्विंटल म्हणजे हेक्टरी ६५.५० क्विंटल ऐवढे भरघोस उत्पादन मिळाले. त्यामुळे त्यांनी सहभाग घेतलेल्या कृषी विभागाच्या पीक स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने प्रयोगशील शेतकरी खामकर यांची निवड झाली आहे.
अशी केली जाते निवड
या स्पर्धेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांच्या फ्लाॅटची पाहणी कृषीविभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते. पिकाची काढणी व मळणी अधिकाऱ्यांच्या साक्षीने फोटो घेऊन केली जाते. त्यानंतर हा सर्व अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला जातो व सदरचे निकाल हे राज्यस्तरावरून घोषित केले जातात. एकंदरीत शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ही स्पर्धा पारदर्शकपणे राबविली जाते.
कृषीविभागाकडून केलेल्या सूचनांचे शेतकऱ्यांनी पालन करणे आवश्यक आहे. ज्वारी पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी मंडळ कृषी अधिकारी निखिल रायकर, कृषीसहायक बी. जी. शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. एकंदरीतच ज्वारीसारख्या पिकासही ठिबक सिंचनाचा वापर केल्यास थोडक्या पाण्यातही भरघोस उत्पादन मिळू शकते, हे यातून सिद्ध झाले. त्यामुळे येणाऱ्या हंगामात सर्व क्षेत्रावर ठिंबक सिंचनावर ज्वारीचे पीक घेण्याचा विचार आहे.
- नीलेश यादव खामकर, आनंदवाडी, ता.भूम